‘निळवंडे व पालखेड’चे पाणी पिण्यासाठी द्या : आ. आशुतोष काळे

‘निळवंडे व पालखेड’चे पाणी पिण्यासाठी द्या : आ. आशुतोष काळे
Published on
Updated on

कोळपेवाडी : पुढारी वृत्तसेवा : मागील वर्षी कमी झालेल्या पर्जन्यमानामुळे कोपरगाव मतदारसंघात दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊन पूर्व भागातील व वरच्या भागातील बहुतांशी गावांत नागरिकांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पिण्यासाठी निळवंडे व पालखेड कालव्याचे पाणी द्या, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे. पालकमंत्री विखे पाटील कोपरगाव दौर्‍यावर आले असता, आ. काळे यांनी मतदार संघाच्या पाणीप्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधून समस्या मांडल्या. ते म्हणाले, की निळवंडे कालव्याच्या चाचणीतून केलेल्या मागणीनुसार निळवंडे डाव्या कालव्याला अतिरिक्त दीड टीएमसी पाणी मिळाले.

त्यामुळे वरच्या भागातील काकडी, मल्हारवाडी, डांगेवाडी, मनेगाव, रांजणगाव देशमुख, वेस, सोयगाव, अंजनापूर, बहादरपूर, धोंडेवाडी, जवळके, शहापूर, बहादराबाद तसेच मतदारसंघातील राहाता, चितळी, धनगरवाडी, वाकडी या जिरायती गावातील नागरिकांना फायदा होऊन भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यास मोठी मदत होऊन आजपर्यंत पाणी पुरले. परंतु उन्हाचा चटका वाढत चालल्यामुळे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. त्यामुळे निळवंडे कालव्यातून या गावातील नागरिकांना पाणी उपलब्ध करून द्यावे. अशीच काहीशी परिस्थिती पूर्व भागातील गावांची देखील झालेली आहे. या भागातील नाटेगाव, आंचलगाव, ओगदी, पढेगाव, कासली, दहेगाव बोलका, शिरसगाव-सावळगाव, तिळवणी, आपेगाव, उक्कडगाव, तळेगाव मळे या भागात भूगर्भाची पाणीपातळी खालावली जाऊन विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे या गावातदेखील पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे.

सध्या पालखेड कालव्याचे पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सुरू असून या आवर्तनातून या गावातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी द्यावे. त्याबाबत जिल्हाधिकार्‍यांना सूचना द्याव्यात अशी मागणी आ. काळे यांनी पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडे केली. गोदावरी कालव्यांचे पाणी पाणी कमी झाल्यामुळे लाभक्षेत्र उजाड होत आहे. अशा परिस्थितीत गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रावर एकामागून एक संकटे चालून येत असून हे संकटे थांबण्याचे नाव घेत नाही, एका संकटाशी संघर्ष सुरू असतानाच दुसरे संकट उभे राहत आहे. दुष्काळी परिस्थितीत समन्यायीचे भूत अगोदरच गोदावरी कालव्यांच्या मानगुटीवर बसलेले असून त्याचा परिणाम मिळणार्‍या आवर्तनावर होत असल्यामुळे लाभक्षेत्रावर मोठा अन्याय झाला आहे.

होणार्‍या अन्यायाच्या विरोधात प्रत्येक अधिवेशनात आवाज उठविला आहे; मात्र सरकार कोणतेही असो सातत्याने नगर-नाशिकच्या शेतकर्‍यांवर अन्याय होत आला आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी नियमित बैठका घेऊन हा अन्याय दूर करावा. वक्राकार दरवाजाच्या माध्यमातून पुन्हा एक नवीन संकट गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्राला ओव्हर फ्लोच्या पाण्यापासून वंचित ठेवू पाहत आहे. नांदूर मध्यमेश्वर बंधार्‍यावर 10 वक्राकार दरवाजे बसविले जाणार असल्यामुळे गोदावरी कालव्यांना ओव्हर फ्लोच्या पाण्यापासून मुकावे लागू शकते त्याबाबत मी जाहीर भूमिका घेतली आहे आपण देखील यामध्ये लक्ष घालावे.

गोदावरी कालव्याचे सिंचनाचे आवर्तन आटोपले असून धरणात आज रोजी जवळपास साडे तीन ते चार टीएमसी पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे दिल्या जाणार्‍या पिण्याच्या पाण्याच्या आवर्तना बरोबरच सिंचनासाठी देखील आवर्तन होवू शकते त्याबाबत देखील आपण गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी केली. त्याबाबतची लेखी मागणी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी अहमदनगर व नाशिक, पाटबंधारे विभाग नाशिक व छत्रपती संभाजीनगर यांच्याकडेदेखील केली आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news