

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील गेवराई येथे सोमवारी भरदिवसा झालेल्या घरफोडीचा माग आता चोरट्यांचा सापडलेला मोबाईलच काढणार असल्याचा कयास आहे. पोलिसांचे युद्धपातळीवर प्रयत्न होत आहेत. चोरटयांच्या मोबाईलमुळेच पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती आहे. गेवराई घरफोडीच्यावेळी झटापटीत चोरट्याचा पडलेला मोबाईल व त्यातला डीपी पोलिसांना तपासासाठी मुख्य आधार ठरला आहे. नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व नेवासा पोलिस ठाणे यांची पथके चोरट्यांना पकडण्यासाठी रवाना झाली आहेत. गेवराई येथील दहा लाखांची भरदिवसा झालेल्या चोरी प्रकरणातील आरोपींचा सुगावा मोबाईलमुळे पोलिसांना अवघ्या काही तासातच लागला आहे.
गेवराई येथील सतरकर वस्तीवर सोमवारी (दि.17) दुपारी चोरी झाली. शेतकरी शिवाजी सतरकर व त्यांची पत्नी विजया यांनी जीव धोक्यात घालून चोरट्यास प्रतिकार केला. चोरट्याच्या हातात लोखंडी कटावणी असतानाही प्रथम शिवाजी यांनी चोरट्याशी झटापट केली. तीन मिनिटे हा थरार चालला. याच झटापटीत चोरट्याचा मोबाईलखाली पडला होता.
चोरट्याचा फोटो मोबाईलला डीपीला असल्याने सतरकर यांनी ओळखले आहे. मोबाईल हाच पोलिसांना तपासासाठी मुख्य आधार ठरला आहे. तिघे चोरटे सराईत असून, एकाच दुचाकीवरून ते पळून कुकाण्याच्या दिशेने गेल्याचे गेवराई लागतच्या सुलतानपूर शिवारात कुकाणा मार्गाने चोरटे पळाल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. सतरकर वस्तीवर चोरट्यांचा पडलेला मोबाईलच पोलीसांना चोरीचा छडा लावण्यासाठी महत्वाचा पुरावा ठरला आहे. या मोबाईल मुळे पोलीसांना या चोरी प्रकरणात आणखी काही माहिती मिळणार असून या प्रकरणात स्थानिक काहीचा सहभाग आहे काय? याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
ज्या चोरट्याचा मोबाईल सापडला तो आष्टी तालुक्यातला असल्याने पोलीस पथक त्याच्या मागावर आहे. एलसीबीचे निरीक्षक दिनेश आहेर, व त्यांची टीम,नेवाशाचे निरीक्षक शिवाजी डोईफोडे, कुकाणा दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, हवालदार तुकाराम खेडकर हे अधिक तपास करत आहेत.
चोरट्यांशी झटापटीचा थरार..
सतरकर वस्तीवर चोरट्याने शिवाजी यांच्या अंगावर लोखंडी कटावणीचा वार केला पण त्यांनी तो हातावर झेलला. दुसरा वार डोक्यावर करताच ती कटावणी पत्नी विजया यांनी जीव धोक्यात घालत हातावर झेलली. त्यामुळे शिवाजी बचावले. तीन मिनिटे हा थरार चालू होता. याच झटापटीत चोरट्यांचा मोबाईल खाली पडला होता. याच मोबाईलने आता त्या तीनही चोरट्यांचा छडा लावण्याचे काम केले आहे.