नाशिक-मुंबई मार्गावरील वाहतूक कोंडीवर मार्ग काढा : आ. बाळासाहेब थोरात

नाशिक-मुंबई मार्गावरील वाहतूक कोंडीवर मार्ग काढा : आ. बाळासाहेब थोरात

संगमनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नाशिक-मुंबई मार्गावरील वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. काही मिनिटांच्या अंतरासाठी काही तासांच्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या प्रश्नावर मंत्री सांगतात ऑगस्ट 2024 पर्यंत हा त्रास सहन करावा लागेल, असे उत्तर देणे अत्यंत असंवेदनशील व चुकीचे आहे. या मार्गावरील वाहतूक कोंडीवर तातडीने मार्ग काढा, अशा स्पष्ट शब्दात काँग्रेसचे नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ सभागृहात संबंधित विभागाच्या मंत्र्यांना खडेबोल सुनावले.

नाशिक -मुंबई रस्त्यावरचा वाहतूक कोंडीचा प्रश्नच आ. रईस शेख यांनी सभागृहात उपस्थित केला होता. तरी मंत्र्यांच्या उत्तराने संतापलेल्या आ. थोरात यांनी या प्रश्नाचे गांभीर्य सभागृहाच्या निदर्शनास आणून देत म्हणाले, भिवंडी बायपास ते ठाणे या प्रवासामध्ये प्रवाशांना दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगांचा सामना करावा लागतो. मी देखील या रस्त्यावरून प्रवास करतो. जळगाव, धुळे, अहमदनगर आणि विदर्भ व मराठवाड्यातील बहुतांश जिल्हे याच मार्गावरून मुंबईत येतात.

या रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याचीच झालेली आहे. मंत्री छगन भुजबळ, दादा भुसे आणि अनिल पाटील हे मंत्री सुद्धा याच मार्गावरून प्रवास करतात की नाही हे. मला माहित नाही असा खोचक सवाल आ. थोरात यांनी मंत्र्यांना विचारला. वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवावाच लागेल, ऑगस्ट 2024 पर्यंत ही वाहतूक कोंडीची समस्या कायम राहील असे सांगतात. त्यावर असे चालणार नाही, तातडीने उपाय योजना कराव्या लागतील, असे आ. थोरात यांनी ठणकावून सांगितले.

आठवडाभरात बदल झालेला दिसेल

यावर मंत्री दादा भुसे म्हणाले, मी स्वतः मागील आठवड्यात या रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा आढावा घेतला आहे. तिथे ज्या ज्या उपायोजना कराव्या लागतील, त्या उपाययोजना करून आठव डाभरात नाशिक-मुंबई या मार्गावर 50 टक्के बदल झालेला दिसेल.

भविष्यात आपण काळजी घ्यावी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंत्री भुसे यांना सांगितले की, राज्यात अनेक ठिकाणी पायाभूत प्रकल्पांचे काम सुरू आहे.भविष्यामध्ये असे पायाभूत प्रकल्प करत असताना आपण पर्यायी व्यवस्था देखील उपलब्ध करून दिली पाहिजे. त्या संदर्भात भविष्यात आपण काळजी घ्यावी.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news