अहमदनगर तालुका; पुढारी वृत्तसेवा : नगर-छत्रपती संभाजी नगर महामार्गावर शुक्रवारी (दि.2) पंपावर सीएनजी गॅस घेऊन जाणार्या आयशर टेम्पोतील सिलेंडरमधून गॅस गळती झाल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. नगरकडून छत्रपती संभाजी नगरकडे पंपासाठी सीएनजी गॅस घेऊन जात असलेल्या टेम्पोमधील गॅस महामार्गावरच लिक झाल्याने मोठा गोंधळ उडाला होता. ही घटना शेंडी शिवारातील हॉटेल सुवर्णज्योत समोर घडली.
गॅसचा प्रेशर एवढा होता की सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत त्याचा आवाज ऐकू येत होता. गॅस गळती सुरू झाल्याने वाहनचालक वाहन सोडून निघून गेला. इतर वाहनचालकांनी ही आपली वाहने दूरच उभी केली. त्यामुळे वाहतूकही ठप्प झाली होती. सुमारे एक तासानंतर संपूर्ण गॅस संपल्याने वाहन चालकांने वाहन बाजूला घेतले. सदर घटनेने नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण तयार झाले होते.
पंपावर घेऊन जात असलेल्या सीएनजी गॅस लीक झाल्याने यामध्ये चूक कुणाची हा प्रश्न उपस्थित होत आहे. सुदैवाने काही अनुचित प्रकार घडला नसला तरी गॅस वाहतूक करणार्या वाहनांबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गॅस वाहतूक करताना सुरक्षितता पाळणे महत्त्वाचे आहे. सदर प्रकरणाची चौकशी करण्याची देखील मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.