

नगर, पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्याततील जोर्वे, काष्टी, कमालपूर, दहिगाव ने यासह 203 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी जिल्ह्याला 4 लाख 6 हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. निवडणूक खर्चासाठी सध्या तरी 2 हजार रुपयांचा निधी प्रत्येक ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेवर खर्च होणार आहे.
नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यात जिल्ह्याततील 203 ग्रामपंचायतींच्या पदाधिकार्यांचा कार्यकाल संपणार आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने 9 नोव्हेंबर रोजी मुदत संपणार्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार तहसीलदार 18 नोव्हेंबर रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करणार आहेत. 28 नोव्हेंबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरु होत आहे. निवडणूक अर्ज स्वीकारणे, उमेदवारांची यादी जाहीर करणे, मतदान तसेच मतमोजणी आदी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी स्टेशनरी, मतदान साहित्य, निवडणूक व मतमोजणीसाठी कार्यरत कर्मचारी यांना भत्ता अदा खर्चासाठी निधीची आवश्यकता आहे.
त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी 50 हजार रुपये यानुसार 1 कोटी 1 लाख 50 हजार रुपये निधीची आवश्यकता आहे. त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य ग्रामविकास विभागाकडे पाठविला होता. ग्रामविकास विभागाने सध्या 2 हजार रुपये प्रमाणे 4 लाख 6 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे 4 लाख 6 हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.