सोनई, पुढारी वृत्तसेवा: नेवासा तालुक्यातील लोहगाव येथील रोहिदास जनार्दन ढेरे यांच्या 16 गायी व 1 कालवडीला चार्यामधून विषबाधा झाल्या प्रकरणी सोनई पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चांगदेव सुखदेव ढेरे यांनी सोनई पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी फिर्यादित म्हटले आहे की, 2 लाख 55 हजार रुपयांच्या 4 काळ्या पांढर्या रंगाच्या संकरित गायी, 1 लाख 20 हजार रुपयांच्या 2 पांढर्या तांबड्या रंगाच्या गायी, 1 लाख 35 हजार रुपयांच्या 2 तांबड्या काळ्या रंगाच्या संकरित गायी व एक कालवड, 2 लाख 40 हजार रुपयांच्या 4 काळ्या पांढर्या रंगाच्या संकरित गायी, 2 लाख 30 हजार रुपयांच्या 4 काळ्या पांढर्या रंगाच्या संकरित गायी अशा एकूण 9 लाख 80 हजार रुपये किमतीच्या गायी विषबाधा होऊन दगावल्या आहेत.
अज्ञात व्यक्तिने गोठ्यात बांधलेल्या गायींच्या चार्यात विषारी औषध टाकल्यामुळे पुतण्या रोहिदास ढेरे यांच्या 22 सप्टेंबर पासून 26 सप्टेंबर पर्यंत 16 गायी व 1 कालवड दगावल्याने सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जि.प. चे माजी सभापती सुनील गडाख व युवा नेते उदयन गडाख यांनी घटनास्थळी भेट देत तातडीने मदत करण्याबाबत पशुसंवर्धन विभागाला सूचना केल्या. काल नाशिक येथील रासायनिक पृथःकरण विभागाने तपासणीसाठी नमुने नेले असून, लवकरच अहवाल प्राप्त होईल.