राहुरी; पुढारी वृत्तसेवा: राहुरी परिसरामध्ये दुचाकी चोरट्यांनी थैमान घातल्याची बातमी दै. पुढारी वर्तमान पत्रात प्रसिद्ध होताच खडबडून जागे होत पोलिसांनी तिघा जणांना गजाआड केले. दरम्यान, चोरी केलेल्या चार दुचाकी हस्तगत केल्याने राहुरी पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे परिसरातून स्वागत केले जात आहे.
चोरीच्या दुचाक्यांसह चोरटे दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी धाड टाकली. दै. पुढारी मध्ये 'दुचाकी चोरट्यांची सौदेबाजी जोमात, पोलिस प्रशासन कोमात' या मथळ्याचे वृत्त प्रकाशित होताच काही तासांतच पोलिसांनी दुचाकी चोरट्यांवर फास आवळण्यास प्रारंभ केला. पो. नि. प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उ. नि. चारूदत्त खोंडे, सज्जन नर्हेडा, पो. ह. जायभाय, सचिन ताजणे, आजिनाथ पाखरे, नदीम शेख आदींनी ही कारवाई केली. 31 ऑक्टोबर रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली.
पोलिस पथकाने घोरपडवाडी घाट हद्दीत धाड टाकत आरोपींचा मनसुबा ओळखत कारवाई केली. दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या विशाल सुभाष बर्डे, संदीप दिगंबर माळी, सागर अशोक बर्डे (सर्व रा. बारागाव नांदूर) यांना पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले. भोंद्या ऊर्फ रवींद्र सूर्यभान माळी, अर्जुन भास्कर माळी (सर्व रा. बारागाव नांदूर, ता. राहुरी) हे अंधाराचा लाभ घेत पळून जाण्यात यशस्वी ठरले.
'पुढारी'मुळे तपास!
दुचाकी चोरट्यांबाबत वाचा फोडत सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. यानंतर पोलिसांनी तीन दरोडेखोरांच्या मुसक्या आवळत चोरलेल्या दुचाकी हस्तगत केल्याने दै. पुढारीचे अभिनंदन होत आहे.