

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील बारागाव नांदूर पाणी योजनेचा वीज पुरवठा खंडित केल्याने आठवड्यापासून लाभार्थी गावांमध्ये निर्जळी निर्माण झाली होती, मात्र अखेर ग्रामस्थांकडून 8 लक्ष रुपयांची वसुली पूर्ण झाल्याने योजना कार्यान्वित होणार असल्याची माहिती मिळाली आहे. कोणत्या न कोणत्या कारणास्तव अडचणी येणार्या बारागाव नांदूर पाणी योजनेकडून आता सुरळीत पाणी पुरवठा होण्याची अपेक्षा लागली आहे. राहुरी तालुक्यातील मुळा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या नदी पात्रालगतच्या 15 गावांना बारागाव नांदूर पाणी योजनेतून पाणी पुरवठा होत आहे. एकेकाळी राज्यात आदर्श असलेल्या या पाणी योजनेच्या अडचणी वाढत चालल्या. 'महावितरण'ची सुमारे 92 लाखांखी थकबाकी असताना संबंधित ग्रामपंचायतींकडे कोट्यवधी रूपयांची थकबाकी थकीत आहे. महावितरण, पाटबंधारे विभागाची देणी वेळेवर अदा करण्यासाठी वसुली होणे गरजेचे आहे.
मागिल आठवड्यात महावितरण विभागाने वसुलीचे हत्यार उपसत वीज पुरवठा खंडित केला, परंतु संबंधित 15 गावांमध्ये पाण्यासाठी महिलांसह ग्रामस्थांची ससेहोलपट होताना दिसली. अखेर पाणी योजनेच्या अध्यक्षा विद्याताई गाडे, सचिव ग्रामसेवक गागरे, समन्वयक शौकत इनामदार यांसह संचालक मंडळाने वसुलीस पुढाकार घेतला. 15 गावांमधून कसेबसे 8 लक्ष रुपयांची वसुली झाली. ही रक्कम महावितरण विभागाला अदा करीत पाणी पुरवठा सुरळीत केला जाणार असल्याची माहिती योजना पदाधिकारी व अधिकार्यांनी दिली.
जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे यांनी सर्व ग्रामस्थांना पाणी पट्टी अदा करण्याचे आवाहन केले आहे. बारागाव नांदूर पाणी योजना ही राज्यात नावलौकिक प्राप्त आहे. योजनेचे अस्तित्व जपण्यासाठी सर्वांचे सहकार्य गरजेचे आहे. शासनाकडे देखभाल दुरुस्तीचे सुमारे 70 लाख रुपये थकीत आहे. ती रक्कम वसुलीसाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
राहुरी तालुक्यामध्ये बारागाव नांदूर पाणीयोजनेचा सतत खंडित होणारा पाणी पुरवठा पाहता अनेक गावांमध्ये बोअरवेलची गाडी फिरताना दिसत आहे. गावठाण हद्दीत अनेकांनी बोअरवेल घेत पाणी टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला. संबंधित 15 गावांमध्ये 20, 25 ठिकाणी बोअरवेल घेत ग्रामस्थांनी पाणी टंचाई समस्येवर मात करण्याचा प्रयत्न केल्याने बोअरवेल व्यावसायिकांना 'अच्छे दिन' आल्याचे बोलले जात आहे.
बारागाव नांदूर ग्रामपंचायतीने 1 लाख 62 हजार रुपये पाणी पट्टी जमा केली. पाणीपट्टीची रक्कम पाहता गावाचा पाणी पुरवठा अधिक काळ बंद राहू नये म्हणून जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रभाकर गाडे यांनी आपल्याकडील 62 हजार रुपये अदा केले, मात्र कोंढवड, तमनर आखाडा, मांजरी या गावांचा थकबाकी न भरल्याने पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती योजना अधिकार्यांनी दिली.