

वीरगाव : पुढारी वृत्तसेवा : अकोले, संगमनेरसह सिन्नर तालुक्यातील 15 गावांच्या 3,914 हेक्टर क्षेत्राचे सिंचन करणारे आढळा धरण अखेर दिर्घ प्रतिक्षेनंतर पुर्ण क्षमतेने भरल्याची माहिती जलसंपदाचे स. अभियंता रजनिकांत कवडे यांनी दिली. सांडव्यावरुन नदीपात्रात पाणी झेपावल्याची बातमी आली आणि लाभक्षेत्रात आनंदाचे उधाण आले. दरम्यान, आढळा पुर्ण क्षमतेने भरले असले तरी लाभक्षेत्रात झालेल्या अत्यल्प पर्जन्यामुळे धोक्यात आलेल्या खरीपासह उभ्या पिकांसाठी आवर्तन सोडण्याची वेळ मात्र यंदा जलसंपदा खात्यावर आली आहे.
गेल्यावर्षी 1060 दलघफू पाणीसाठा क्षमतेचा हा मध्यम प्रकल्प 22 जुलै रोजी पुर्ण क्षमतेने भरला होता. यंदा मात्र पाणलोटात अत्यल्प पर्जन्यमानामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत तब्बल दीड महिना उशीर झाला. शिवाय गेल्या वर्षीच्या 537 दलघफू शिल्लक पाणीसाठ्यात 523 दलघफू इतक्याच नवी पाण्याची आवक झाल्याने पाणलोटात कमी झालेल्या पावसाचा अंदाज येतो.
दोन दिवस बरसलेल्या कमी-अधिक प्रमाणातला संततधारेचा मान्सुन आढळा धरणास वरदान ठरला. पावसाने डोळे उघडल्याने 24 तासांत केवळ 2-3 दलघफू पाण्याची आवक असायची. धरण भरेल की नाही, या शंकेने लाभक्षेत्रात चिंता होती. धरण भरल्यानंतर सांडव्यावरुन 70 क्यूसेक पाण्याचा विसर्ग झाला. सांडव्यावरुन नदीपात्रात झेपावलेल्या पाण्यात अधिक वाढ झाल्यास नदी प्रवाही होईल. नदीपात्रात छोटे- मोठे बंधारे भरण्यास मदत होईल.
दोन दिवस पावसामुळे मरणासन्न खरिप बाजरी, मका, सोयाबीन पिकांना चांगली टवटवी आली. माना टाकलेल्या खरीपासह सर्व उभ्या पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकर्यांच्या चेह-यावरील चिंता काहीशी दूर झाली. आढळा भरल्याचा आनंद असला तरी पावसाळा कोरडाठाक गेल्याने भविष्यात पाण्याचा तुटवडा जाणवण्याची शंक्यता मात्र सतावत आहे. उर्वरीत पावसाचे दिवस तरी भरभरुन पाण्याचे असावेत, जेणेकरुन नदीसह शेत-शिवारातले ओढे-नाले वाहतील. भूजलस्तर वाढल्यास वर्षाची चिंता मिटेल, ही अपेक्षा आहे.
कमी पावसामुळे आढळा लाभक्षेत्रात खरीपासह इतर उभी पिके जळाली. 330 हेक्टर क्षेत्रावर पाणी मागणी झाल्याने आवर्तन सुरु झाले. यात साधारणतः 100 दलघफू पाणी वापर होईल. खरीपास भर पावसाळ्यात पाणी सोडण्याची ही वेळ बहूदा अनेक वर्षांनंतर आली असावी.
– रजनिकांत कवडे, जलसंपदाचे सहाय्यक अभियंता
हे ही वाचा :