नगर : ‘सुरभी’वर गुन्हा दाखल करा; नगरसेविका पल्लवी जाधव यांची मागणी

नगर : ‘सुरभी’वर गुन्हा दाखल करा; नगरसेविका पल्लवी जाधव यांची मागणी
Published on
Updated on

नगर; पुढारी वृत्तसेवा : नगर-औरंगाबाद रस्त्यालगत असणार्‍या सुरभी हॉस्पिटलने (जागा मालकाने) मनपाकडे लष्कराचा बनावट ना-हकरत दाखल सादर केल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यावर आयुक्तांनी अद्यापि कारवाई केली नाही. सुरभी हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नगरसेविका पल्लवी जाधव यांनी केली. त्या मागणीला स्थायी समिती सदस्यांनी समर्थन दिले. त्यावर आठ दिवसांत कार्यवाही पूर्ण करून गुन्हा दाखलची प्रक्रिया करू, असे आश्वासन नगररचनाकार राम चारठणकर यांनी दिले.

महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सोमवारी (दि. 27) सभापती गणेश कवडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी समिती सदस्य नगरसेवक नजीर शेख, सुनील त्रिंबके, मुद्दसर शेख, प्रदीप परदेशी, नगरसेविका मंगल लोखंडे, सुवर्णा गेणप्पा, ज्योती गाडे, पल्लवी जाधव आदी उपस्थित होते. सभेमध्ये एकूण नऊ विषयांवर चर्चा झाली. त्यास स्थायी समितीने मान्यता दिली. नगरसेविका पल्लवी जाधव यांनी सुरभी हॉस्पिटलच्या जागा मालकाने बांधकाम परवानगीसाठी महापालिकेकडे सादर केलेला लष्कराचा ना-हरकत दाखल बनावट असल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट झाले आहे. मग, त्यावर कारवाई का होत नाही.

त्यात नेमके काय गौडबंगाल सुरू आहे, समजायला तयार नाही. त्यावेळी सर्वच नगरसेवकांनी ही मागणी लावून धरली. त्यावर नगररचनाकार चारठाणकर म्हणाले, सुरभी हॉस्पिटलच्या जागा मालकाची बांधकाम परवानगी सन 2016 ची आहे. महापालिकेने केलेल्या चौकशीत त्यांनी सादर केलेली लष्कराची एनओसी बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसा अहवाल वरिष्ठांना दिला आहे. आता संबंधित जागा मालकाला नोटीस देऊन त्यांचे म्हणणे सादर करण्यास सांगितले जाणार आहे. त्यात ना-हरकत प्रमाणपत्र बनावट आढळल्यास, बांधकाम परवाना व भोगवाटा प्रमाणपत्र रद्द करण्यात येईल. भोगवटादारावर नियमानुसार फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल.

'त्यांना' जलविहार मोफत!
मनपाच्या जलतरण तलावामध्ये या वर्षीपासून महापालिकेचे पदाधिकारी, कर्मचारी, अधिकारी यांना मोफत जलविहार करता येणार आहे. त्यांच्यासाठी महापालिकेतून पासेस दिले जातील. तसा ठराव स्थायी समितीमध्ये घेण्यात आला.

कुत्रे पकडले तर पत्र घ्या
महापालिकेच्या हद्दीत सर्वत्र मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. कुत्रे पायी जाणार्‍या नागरिकांना चावा घेतात. कोंडवाडा विभागाचे अधिकारी नुसते म्हणतात वाहन पाठविले आहे. परंतु, प्रत्यक्षात वाहन येत नाही, असा आरोप सुनील त्रिंबके, मंगल लोखंडे यांनी केला. त्यावर सभापती कवडे यांनी सांगितले की, कुत्रे पकडल्यानंतर त्या प्रभागातील नगरसेवकांचे पत्र घ्या व त्यांची नोंद ठेवा. संबंधित ठेकेदाराला उद्या सभेत हजर राहण्यास सांगा.

अधिकार्‍यांची पदे रद्द करा : जाधव
सुरभी हॉस्पिटलमध्ये अनेक बेकायदेशीर प्रकार सुरू असतात. त्यावर आरोग्य अधिकार्‍यांचे नियंत्रण असे आवश्यक आहे. त्यावर कारवाई होत नसेल तर, नगररचनाकार व आरोग्य अधिकार्‍यांची पदे रद्द करा, अशी मागणीही पल्लवी जाधव यांनी यावेळी केली.
सुरभी हॉस्पिटलच्या जागा मालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी. नगर शहरातील सर्वच हॉस्पिटलच्या परवानगीच्या फायली सभागृहात आणाव्यात.

                                                         – गणेश कवडे, सभापती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news