नगर : जेऊरच्या सरपंचपदासाठी फिल्डिंग ; नूतन निवडीसाठी राजकीय घडामोडींना आला वेग

नगर : जेऊरच्या सरपंचपदासाठी फिल्डिंग ; नूतन निवडीसाठी राजकीय घडामोडींना आला वेग

नगर तालुका :  पुढारी वृत्तसेवा :  नगर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाची समजली जाणार्‍या जेऊर ग्रामपंचायतच्या सरपंच राजश्री मगर यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी वर्णी लागावी, यासाठी इच्छुकांकडून 'फिल्डिंग' लावण्याचे काम सुरू झाले आहे. 17 सदस्य असलेल्या जेऊर ग्रामपंचायतची निवडणूक चुरशीची झाली होती. माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी गाव हिताचा विचार करून विजयी सदस्यांना एकत्र करत राजश्री मगर यांना सरपंच पद दिले. अपवाद वगळता सर्वच सदस्यांनी माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचे नेतृत्व मान्य केल्याने गावातील गट- तट विसरून गाव विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांना होती. परंतु दोन वर्षाच्या काळात गावात किती कामे झाली अन् खरंच सरपंच पदाच्यावेळी कर्डिले यांचे नेतृत्व मान्य केलेले सर्व सदस्य एकत्र आले का ? हा संशोधनाचा विषय ठरेल.

जेऊर गावात ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून प्रथमच सर्वसाधारण महिला सरपंच होण्याचा मान राजश्री मगर यांना मिळाला. निवडणुकीत सर्वसाधारण महिला राजश्री मगर, ज्योती तोडमल, मिना पवार, वंदना विधाते या ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेल्या आहेत. सर्वसाधारण महिलेला सरपंच पदाची संधी मिळाल्याने सरपंच पदासाठी रस्सीखेच सुरू होती. माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी सर्वांची एकत्रित बैठक घेत त्यावर तोडगा काढला. दीड दीड वर्षाचा फॉर्म्युला अवलंबण्यात आला. राजश्री मगर यांना सरपंच पद बिनविरोध देण्यात आले.

दोन वर्षाच्या कालावधीनंतर सरपंच राजश्री मगर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दि. 30 डिसेंबर रोजी गटविकास अधिकारी यांच्याकडे राजीनामा देण्यात आल्यानंतर 10 जानेवारी रोजी ग्रामपंचायत सदस्यांची बैठक झाली. बैठकीत राजीनामा पडताळणी करण्यात आली व नूतन सरपंच निवडणुकीची प्रक्रिया प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे.

सरपंच पदासाठी नावे चर्चेत !

नूतन सरपंच पदासाठी ज्योती तोडमल यांचे नाव आघाडीवर आहे. तसेच मिना पवार, वंदना विधाते या ही सरपंच पदाच्या रेसमध्ये आहेत. त्याचप्रमाणे इतर महिला सदस्य ही सरपंच पदावर दावा करत आहेत. जेऊर गावच्या सरपंच पदी कोणाची वर्णी लागणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष आहे. मात्र सरपंचासमोर गावातील समस्यांचे निराकरण करण्याचे मोठे आव्हान असणार आहे.  गावात आज गटार, पाणी, शौचालय युनिट, कचरा, अतिवृष्टीने वाहून गेलेले रस्ते, पुल दुरुस्ती, आरोग्य, पथदिवे, ग्राम स्वच्छता, ग्रामसुरक्षा यंत्रणा बंद या सर्व समस्यांवर तोडगा काढणे गरजेचे आहे. तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्यांशी जुळवून घेत गाव विकास करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ग्रामविकासाची अपेक्षा

दोन वर्षाच्या काळात सदस्यांमध्ये पडलेले गट आरोप-प्रत्यारोप ग्रामस्थांनी अनुभवलेलेच आहेत. यापुढे तरी ग्रामपंचायत मध्ये एकीची भावना जोपासत गाव विकास व्हावा, अशी माफक अपेक्षा ग्रामस्थ करत आहेत.

कर्डिलेंचा शब्द अंतिम
माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांची सत्ता ग्रामपंचायतीमध्ये असल्याने त्यांचा शब्द सरपंच पदासाठी प्रमाण मानला जाणार आहे. सरपंच पद खुल्या वर्गातील महिलेसाठी राखीव आहे. ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून प्रथमच सर्वसाधारण महिलेला सरपंच पदाची संधी मिळाल्याने त्या बाबीचा सरपंच पद देताना निश्चितच विचार केला जाणार यात शंका नाही.

त्या सहा जणांची खमंग चर्चा

जेऊर गावात दोन वर्षापासून ग्रामपंचायतचा कारभार, गाव विकास, अधिकारी याबाबत चुप्पी साधलेले ते सहाजण आता पुन्हा डोकेवर काढणार. ग्रामपंचायतचा कारभार, अधिकारी, ठेकेदार तसेच ठराविक ग्रामपंचायत सदस्य यांना टार्गेट करत सोशल मीडिया तसेच इतर माध्यमातून गाव विकासाच्या पोकळ गप्पा मारणारे स्वयंघोषित गावपुढारी पुन्हा सक्रिय होणार असल्याची खमंग चर्चा गावातील चौकाचौकात झडत आहे.

सरपंच पदी कोणाचीही निवड होवो. त्याच्याशी ग्रामस्थांना काही देणे घेणे नाही. फक्त गावातील समस्या व विकास कामे महत्त्वाची आहेत. सर्व सदस्यांनी एकत्र येत गाव विकासाबाबत ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. जिरवा जिरवीचे राजकारण थांबवुन गाव विकास कसा करता येईल याकडे नूतन सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी लक्ष द्यावे.
                                                                     -अविनाश तोडमल ( ग्रामस्थ)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news