कोंढवड : पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील पूर्व भागाला जोडणारा तांदुळवाडी कोंढवड येथील मुळा नदीवरील पुल दुरुस्तीची दीड वर्षापूर्वी प्रशासकीय मान्यता मिळवूनही आजतागायत पुलाची दुरुस्ती न झाल्यामुळे मुळा धरणातून सोडण्यात आलेल्या 25 हजार पाण्याचा विसर्गामुळे कोंढवड येथील पुलावरून पाणी वाहिल्याने मोठ्या प्रमाणात पुलाचे स्टील उघडे पडुन काही भागात स्लॅब कोसळला तर कठडे वाहुन गेले आहे.
राहुरी तालुक्यातील कोंढवड तांदूळवाडी येथील मुळा नदीवरील पुलाचे स्टील उघडे पडुन काही ठिकाणी या पुलाचा भाग कोसळला होता. एका ठिकाणी मोठे खड्डे पडले आहे. त्यावेळी क्रांतीसेनेने वेळोवेळी पाठपुरावा करून या पुलाच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या पुलावरून कोंढवड, शिलेगाव, करपरावाडी, तांदुळवाडी व आसपासच्या परिसरातील नागरिक, विद्यार्थी ये-जा करतात. मुलांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
दूध घालणार्या शेतकर्यांचे खूप हाल होत आहेत. या उघड्या स्टील व कोसळलेल्या भागामुळे पुल वाहतुकीसाठी धोकादायक बनल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे या पुलावर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. या पुलाची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर पुल दुरूस्ती कामाची प्रशासकीय मान्यता मार्च 2021 मध्ये जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध झाला असतानाही संबंधित ठेकेदाराने रस्त्याचे काम फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात केले, मात्र पुल दुरुस्ती कामाकडे पुर्णतः दुर्लक्ष केल्यामुळे पुलावरून पाणी गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रस्त्याचे काम चार महिन्यांतच ठिक- ठिकाणी खचुन खड्डे पडल्याने निकृष्ट दर्जाचे काम झाले असल्याचे निदर्शनास येत आहे.