Ahilyanagar Accident News: नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील भीषण अपघातामध्ये दोन तरुणांचा बळी गेला आहे. पीकअप व दोन दुचाकी वाहनाची समोरासमोर धडक होऊन चैतन्य लांबे व शिवाजी जाधव यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेत पायी चालणारी एक महिला व अन्य तिघे जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्ग मृत्युचा सापळा बनला आहे. रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास पीकअप वाहन हे राहुरी खुर्द हद्दीत सात मौलाया परिसरातून भरधाव जात होते. या गाडी चालकाने दोन दुचाकीला धडक दिली. तर पायी चालणार्यांनाही धडक दिल्याचे समजले.
या अपघातात दुचाकीवरील चैतन्य लांबे व शिवाजी जाधव हे दोघे ठार झाले. तर जखमींमध्ये मध्य प्रदेश येथील सोनिया सेनानी, राहुरी खुर्द येथील शहानोर इस्माईल पठाण, मरियम शहानोर पठाण यांचा समावेश आहे.
दरम्यान, अपघात घडताच तेथून जात असलेले युवा नेते अक्षय कर्डिले व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जखमींना रुग्णालयात नेण्यास मदत केली. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष सुर्यकांत भुजाडी, माजी नगरसेव नंदकुमार तनपुरे, अक्षय तनपुरे, संजय साळवे, प्रदिप पवार, नगर- मनमाड कृती समितीचे देवेंद्र लांबे, संतोष आघाव, ज्ञानेश्वर बाचकर, नरेंद्र शिंदे, भाऊ जाधव, नरेंद्र शेटे, आकाश शेटे, युनूस शेख, रशीद शेख, मनोज गरड, मच्छिंद्र पाटोळे, कुंदन बाचकर आदींनी मदतीसाठी पुढाकार घेतला होता.
ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर गैरहजर!
अपघातानंतर जखमींना घेऊन राहुरीच्या ग्रामिण रुग्णालयात आल्यानंतर तेथे वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नव्हते. तसेच कर्मचार्यांची अनुपस्थिती पाहता सर्वांनीच वैद्यकीय प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नाराजी व्यक्त केली.
तनपुरे-कर्डिले समर्थक आमनेसामने!
अक्षय कर्डिले समर्थकांनी राहुरीच्या ग्रामिण रुग्णालय बाबत संताप व्यक्त करीत वैद्यकीय अधिकारी नेमके कोणाच्या निगराणीत काम करतात? ग्रामिण रुग्णालयाचा परिसर पाहता संबंधित ठिकाणावर रुग्णांवर उपचार कसे होणार? आदी प्रश्न विचारत संताप व्यक्त केला. तर तनपुरे समर्थकांनीही संबंधित रुग्णालयाचे काम राज्य शासनाच्या माध्यमातून चालते. शासनाच्या दुर्लक्षित भुमिकेनेच राहुरीच्या ग्रामिण रुग्णालय इमारतीचे काम न झाल्याने ही वेळ आल्याचा आरोप केला. दोन्हीकडील कार्यकर्ते आमने सामने आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.