रायगड ः विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने रायगड जिल्हयात पोलिसांचे धाडसत्र वेगात सुरु आहे. त्यामुळे अवैध धंदेवाल्याचे धाबेदणाणले आहेत. आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी होण्यासाठी विविध पथकांची दिवस-रात्र गस्त सुरू आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून गेल्या अकरा दिवसात रायगड पोलीसांनी एकूण 243 केसेस केल्या आहेत. त्यात 31 जणांना अटक करण्यात आली आहे. तर 10 कोटी 20 लाख 8 हजार 182 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
15 ऑक्टोबर 2024 रोजीपासून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोग, नवी दिल्लीकडून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे, अवैध धंंद्यांना आळा बसावा यासाठी रायगड पोलीस विभागाने जोरदार धाडसत्र सुरु केले आहे. 15 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर रोजीपर्यंत रायगड जिल्हयात जप्ती संबंधाने मोठया प्रमाणात कारवाई चालू आहे. दरम्यानचे काळात अवैध दारूजप्ती च्या 226 केसेस केलेल्या असून त्यामध्ये अवैध दारू 55 हजार 188 लिटर जप्त केली आहे. त्याची किंमत 25 लाख 30 हजार 588 रूपये आहे. अवैध गुटखाजन्य पदार्थाच्या 11 केसेस केलेल्या आहेत. त्यामध्ये 2 हजार 474 पाकिटे हस्तगत केली आहेत. या पाकिटांची किंमत 6 लाख 25 हजार 58 रूपये आहे. या प्रकरणी 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अंमली पदार्थ सदराखाली तीन केसेस करण्यात आल्या आहे. या तीन केसेसमध्ये 1.3 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या गांजाची किंमत 22 हजार 600 आहे. याप्रकरणामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. विशेष कामगिरी म्हणून स्थानिक गुन्हे अन्वेशण शाखा, रायगड यांचेकडून तंबाखूजन्य पदार्थ अंतर्गत 825 किलोग्रॅम सगारेट निर्मिती करण्याकरिता लागणारे सुगंधी तंबाखू, सिगारेट बनविण्याकरिता लागणारे कागद, पॅकिंग बॉक्स, 3 सेमी अॅटोमॅटिक मशिन असा एकूण किंमत 4 कोटी 94 लाख 46 हजार 900 रूपयांचा माल जप्त केला आहे. यात 15 आरोपींना अटक करण्यात आली आहे. खालापूर पोलीस ठाणे अंतर्गत टोलनाक्यावरील भरारी पथकाचे मार्फतीने नाकाबंदी दरम्यान पिकअप टेम्पोमधील मालाची तपासणी केली असता, त्यामध्ये 883.159 किलोग्रॅम वजनाची चांदी वेगवेगळया बॉक्समधील व सोन्याचे तयार दागिने 143.709 ग्रॅम वजनाचे 5 कोटी 20 लाख 8 हजार 182 रूपये किंमतीचे असे जप्त करण्यात आले आहे.
रायगड पोलीसांची सराईत गुन्हेगार, निवडणूकीमध्ये अडथळा निर्माण करणारे इसम, अवैध धंदे करणा-या इसमांवर करडी नजर असून गोपनिय यंत्रणा सतर्क करण्यात आलेली आहे. सदर कारवाई करिता जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
रायगड जिल्हयात शांततापुर्ण व भयमुक्त निवडणूक पार पाडण्याकरिता रायगड पोलीस सतर्क व तत्पर असून सराईत गुन्हेगार, निवडणूकीमध्ये अडथळा निर्माण करणारे इसम, अवैध धंदे करणा-या इसमांवर करडी नजर असून गोपनिय यंत्रणा सतर्क करण्यात आलेली आहे. गुप्त बातमीदार यांच्यामार्फत माहिती हस्तगत करून जास्तीत जास्त प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे.