

पुणतांबा : पुढारी वृत्तसेवा : गणेश साखर कारखाना चांगला चालावा म्हणून सभासद शेतकर्यांनी आमच्यावर विश्वास दाखवून सत्ता परिवर्तन केले. यंदाच्या हंगामात सव्वातीन लाख टन ऊस गाळप करण्याचे गणेश कारखान्याचे उद्दिष्ट आहे. ते साध्य करण्यासाठी 'गणेश'च्या कार्यक्षेत्रातील शेतकर्यांनी जास्तीत जास्त उसाची लागवड करावी आणि आपला ऊस बाहेरच्या कारखान्याला न देता 'गणेश' लाच द्यावा आणि कारखाना चांगल्या प्रकारे चालविण्यासाठी आम्हाला साथ द्यावी, असे आवाहन मार्गदर्शक तथा सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले.
श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त ऊस लागवड व्हावी आणि एकरी ऊस उत्पादन वाढावे, यासाठी कारखान्याच्या वतीने आयोजित केलेल्या ऊस विकास मेळाव्यात बोलत होते. मेळाव्याचे उदघाटन गणेशचे मार्गदर्शक तथा माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ऊसतज्ज्ञ कृषिभूषण संजीव माने (आष्टा, जि. सांगली) यांनी शाश्वत एकरी ऊस उत्पादन वाढीबाबत शेतकर्यांना सखोल मार्गदर्शन केले.
कोल्हे म्हणाले, निवडणूक संपल्यानंतर सहकार क्षेत्रातील राजकारण संपते, असे म्हणतात; पण गणेशची निवडणूक संपल्यानंतर काही अदृश्य शक्ती कारखाना चालू नये म्हणून जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करत आहेत. मात्र, काहीही झाले तरी आम्ही हा कारखाना चांगल्या प्रकारे चालविण्यासाठी कटिबद्ध आहोत. आ.थोरात यांच्यामुळे 'गणेश' ला बँकेकडून कर्ज मिळणार आहे. कारखान्याला अडचणीतून बाहेर काढून कारखान्याला व गणेश परिसराला गतवैभव मिळवून देण्यासाठी संचालक मंडळ व आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत असून, त्यासाठी सर्व सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले पाहिजे.
आ. थोरात म्हणाले, गणेश कारखाना चांगला चालावा, अशी आपली सर्वांची मनापासून इच्छा आहे. कारखान्याचे अधिकारी, कामगार यांच्यात चांगली क्षमता आहे; पण गणेशला ऊसाची गरज आहे. या कारखान्याला पुन्हा पूर्वीचे वैभव मिळवून देण्यासाठी कार्यक्षेत्रात ऊस लागवड वाढणे गरजेचे असून, शेतकर्यांनी काटकसरीने पाण्याचा वापर व नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेतले पाहिजे. गेली आठ वर्षे गणेश ज्यांच्या ताब्यात होता, त्या प्रवरेच्या नेत्यांनी कारखान्याला सहकार्य करण्याचे जाहीर केलेले आहे. जर त्यांना खरोखर 'गणेश'ची काळजी असेल तर त्यांनी 'गणेश'च्या कार्यक्षेत्रातील ऊस पळवू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.
ऊसतज्ज्ञ संजीव माने यांनी ऊसशास्त्रज्ञांच्या सल्ल्याने आपण वेगवेगळे प्रयोग करून विक्रमी ऊस उत्पादन कसे घेतले याची माहिती देत एकरी ऊस उत्पादन वाढविण्यासाठी शेतकर्यांना काही महत्त्वपूर्ण टिप्स दिल्या. मेळाव्यास कारखान्याचे अध्यक्ष सुधीर लहारे, उपाध्यक्ष विजय दंडवते, डॉ. एकनाथ गोंदकर, लोणी गावच्या सरपंच प्रभावती घोगरे, 'गणेश' चे माजी शिवाजीराव लहारे, माजी संचालक अशोकराव दंडवते, गंगाधरराव चौधरी, अप्पासाहेब बोठे, श्रीकांत मापारी, अॅड. पंकज लोंढे, अविनाश दंडवते, विक्रांत दंडवते, अनुप दंडवते उपस्थित होते.
पाणी लढ्यासाठी एकत्र यावे
दारणा धरण समुहातील धरणातून कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर व अन्य तालुक्यांना गोदावरी कालव्यांद्वारे मिळणारे हक्काचे पाणी बिगरसिंचनासाठीचे आरक्षण वाढल्याने कमी झाले आहे. मेंढेगिरी समितीच्या अहवालामुळे व समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे नगर जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा आली आहे. आपल्या हक्काचे पाणी मिळविण्यासाठी आता शासनाकडे व नवीन समितीपुढे सर्वपक्षीय नेत्यांनी संघटित होऊन समर्थपणे आपली बाजू मांडली पाहिजे. हक्काच्या पाण्यासाठी एकत्रितपणे लढा देण्याची गरज आहे.