

नेवासा; पुढारी वृत्तसेवा : जन्म तारखेच्या नोंदीत तपावत आढळल्याने नेवासा पंचायत समितीचे सहायक प्रशासन अधिकारी दीपक भगवान कंगे यांनी कार्यालयीन गैरवर्तन केल्यामुळे शिस्तभंगाची कारवाई केली. जिल्हा सेवा तरतुदीनुसार समय श्रेणीतील निम्नस्तर देऊन कारवाई करण्यात आली असल्याचा आदेश अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी काढला आहे. याप्रकरणी दीपक कंगेंवर फौजदारीची कारवाई करण्याची मागणी तक्रारदार कृष्णा शिंदे यांनी केली.
दीपक कंगे सध्या नेवासा पंचायत समितीमध्ये कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी मुख्यालय, राहता, श्रीरामपूर या ठिकाणी काम केले असून, श्रीगोंदा येथे काम करताना त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. कंगे कर्मचार्यांना त्रास देत असल्याच्या अनेक तक्रारी वरिष्ठांकडे करण्यात आल्या; परंतु वेगवेगळ्या पद्धतीचा दबाव टाकून या तक्रारी मिटवण्यात आल्या होत्या.
त्यांचा जन्म तारखेचा दाखला, अहमदनगर महानगरपालिकेने दिलेला जन्म नोंदणीचा दाखला यात तफावत आढळली आहे. त्यांची जन्मतारीख 1967 असताना ती 1970 करण्यात आली. या संदर्भात त्यांची विभागीय चौकशी करण्यात आली. त्यात ते दोषी आढळले आहेत. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर कंगे यांना शिक्षा झाली पाहिजे, यासाठी आग्रही होते.
विभागीय चौकशीमध्ये कंगे यांनी जन्मतारखेत केलेली तफावत सिद्ध झाली असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी या संदर्भात आदेश करून कंगे यांना निम्नस्तरावर आणण्याबाबतचा आदेश काढला आहे. जिल्हा परिषदेमध्ये अनेक कर्मचारी, अधिकार्यांच्यावर कारवाई केली जाते. कंगे यांनी जन्मतारखेत खाडाखोड करून सरकारची फसवणूक केली, हा गंभीर गुन्हा असल्याने फौजदारी स्वरुपाची कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
दबाव टाकून प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न
कंगे वरिष्ठ सहायक पदावर सामान्य प्रशासन विभाग (नगर) येथे कार्यरत असताना जन्म तारखमध्ये बदल करण्याबाबत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी प्राजक्ता लवंगारे यांच्याकडे अर्ज केला होता. कंगेंनी पदाचा गैरवापर करून जन्म तारखेत बदल करण्याचा आदेश काढला. याबाबत तक्रारी झाल्यानंतर सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, संदीप कोईमकर, सुरेश शिंदे (प्रभारी) यांच्यावर दबाव टाकून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न झाला.
फौजदारी कारवाई झाली पाहिजे : कृष्णा शिंदे
कंगे यांनी कर्मचार्यांना फार त्रास दिला असून, स्वतःच्या फायद्यासाठी जन्मतारखेत बदल केला. परंतु, चौकशीत
आरोप सिद्ध झाले. सरकारची फसवणूक केली म्हणून कंगे विरोधात फौजदारी कारवाई झाली पाहिजे, असे
तक्रारदार कृष्णा शिंदे यांची मागणी आहे.