Nagar : गर्भवतींनी घेतलाय खडका रस्त्याचा धसका!

Nagar : गर्भवतींनी घेतलाय खडका रस्त्याचा धसका!
Published on
Updated on

नेवासा : पुढारी वृत्तसेवा :  नेवासा-खडका रस्त्याचे दुरवस्था झाल्याने तीनतेरा केव्हाच वाजले आहेत. राजकीय मंडळींसह संबंधित अधिकारी वगाचे या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याने प्रवासी व वाहनधारकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांची हाडे मोडकळीस आली आहेत. आता गरोदर महिलांनी या रस्त्यावरून प्रवास करण्याचे बंदच केले आहे. या महिलांनी खड्ड्यात लोप पावत चाललेल्या खडका रस्त्याचा अक्षरश: धसका घेतला आहे. नेवासा-खडका हा रस्ता नेवासा शहरातील मार्केट यार्ड पासून खडक्याकडे जातो. या पाच किलोमीटर रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी विविध क्षेत्रातील, तसेच राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांकडून आंदोलने करण्यात आली. तर, काहींनी आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे.

या रस्त्याचे अनेक वर्षांपासून वाटोळे झालेले आहे. मध्यंतरी कधी मध्ये थिगळं लावून तात्पुरती मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु, कायमस्वरूपी दुरूस्ती करण्याचे या रस्त्याचे भाग्य अद्याप उजळले गेलेले नाही. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने प्रवास करताना या ठिकाणी रस्ताच नसल्याचे जाणवत आहे. देवगड, गंगापूर, मराठवाड्यातील गावांना जाण्याचा हा सोपा व जवळचा मार्ग आहे. मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा प्रवास या रस्त्यावरून असतो. पश्चिमेकडील राहुरी, श्रीरामपूर आदी भागातील दशक्रियाविधीसाठी प्रवरासंगमच्या रामेश्वर मंदिराकडे जाणार्‍या नागरिकांचा राबता मोठ्या प्रमाणावर आहे. आता रस्ताच असून नसल्यासारखा झालेला असल्याने वाहनधारकांचे, नागरिकांचे, शेतकर्‍यांचे हाल होत आहेत.

या परिसरातील शेतकरीही पूर्णपणे वैतागला आहे. शालेय विद्यार्थी, दूध उत्पादक, परिसरातील कामगार, मजूर, देवगडला जाणार्‍या भाविकांबरोबरच गरोदर महिलांना या रस्त्याचा झटका बसत आहे. लहान मोठे अपघात होत आहेत. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत आहे. अनेकांचा बळी या खड्ड्यांमुळे गेले आहेत. मात्र, कोणालाच या रस्त्याचे सोयरसुतक नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण जास्त असल्याने दवाखान्यात जाणार्‍या गरोदर महिलांना चांगलेच धक्के बसत असल्याने त्यांच्यातून संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. या रस्त्यावरून बाळंतपणासाठी जाण्याचेच गरोदर महिलांनी बंद केले आहे. रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी संबंधित विभागाने तातडीने प्रयत्न करणे गरजेचे आहे, अशी मागणी होत आहे.

रस्त्यासाठी मुहूर्त कधी लागणार?
नेवासा-खडका रस्त्यांची केव्हा तरी डागडुजी केली जाते. मजबुतीकरणासाठी प्रयत्न होत नाहीत. त्यासाठी मुहूर्त कधी लागणार आहे? सर्वांनीच रस्ता दुरुस्तीसाठी दुर्लक्ष केल्याने आता जनतेसह मोठे आंदोलन उभारावे लागणार आहे, असे सामाजिक कार्यकर्ते अनिल ताके यांनी सांगितले.

दत्तजयंतीला भाविकांची होणार परवड
देवगडला डिसेंबर महिन्यात दत्तजयंतीचा मोठा महोत्सव होणार आहे. खडका रस्त्यावरील मधला खलालप्रिंपी रस्ता रखडला होता. त्याचे काम सुरू असल्याने अडचणी येणार आहेत. तर, देवगडला जाणार्‍या भाविकांची खडका रस्त्याचीही दुरवस्था झाल्याने परवड होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news