

नगर : पुढारी वृत्तसेवा : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतपत्रिकेचा वापर होणार असून, मतदारांना पसंतीक्रम देण्याची सुविधा आहे. कोणत्याही उमेदवाराच्या नावापुढे केवळ एकच अंक नोंदवा. एकच अंक एकापेक्षा अधिक उमेदवारांच्या नावापुढे नोंदविल्यास मतदान बाद होणार आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाची 30 जानेवारीला निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या पाच जिल्ह्यांत एकूण 338 मतदान केंद्र असणार आहेत. या निवडणुकीसाठी मतदारांना उमेदवारांना पसंतीक्रम देण्याची सुविधा आहे. त्यामुळे पदवीधर मतदार असूनही मतदान बाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक विभागाने मतदान कसे करावे याच्या टीप्स दिल्या आहेत.
निवडलेल्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावापुढे पसंतीक्रम नोंदवावा. रकान्यात '1' हा अंक लिहून मत नोंदवा. मत नोंदविण्यासाठी आपल्याला मतपत्रिकेसोबत पुरविण्यात आलेल्या जांभळ्या स्केच पेनचाच वापर करावा. इतर कोणताही पेन, पेन्सिल, बॉलपॉइंट पेन वापरू नका.एकापेक्षा अधिक उमेदवार निवडून द्यायचे असले तरी '1' हा क्रमांक एकाच उमेदवाराच्या नावापुढे नोंदवावा. निवडून देण्यात येणार्या उमेदवारांची संख्या कितीही असली तरी निवडणूक लढविणार्या उमेदवारांच्या संख्येइतके पसंतीक्रमांक उपलब्ध असणार आहेत. अरलेल्या उमेदवारांसाठी पसंतीक्रमानुसार पुढील पसंतीक्रमांक अनुक्रमे 2, 3, 4 इत्यादी नोंदवावेत. कोणत्याही उमेदवाराच्या नावापुढे केवळ एकच अंक नोंदवा. एकच अंक एकापेक्षा अधिक उमेदवारांच्या नावापुढे नोंदवू नका.
या मतपत्रिका ठरणार बाद
मतपत्रिकेवर स्वाक्षरी करू नका, आद्याक्षरे लिहू नका, आपले नाव लिहू नका किंवा कोणताही शब्द लिहू नका. तसेच, मतपत्रिकेवर अंगठ्याचा ठसा उमटवू नका.पसंतीक्रम दर्शविण्यासाठी '' किंवा '' अशा खुणा करू नका. अशा खुणा केलेल्या मतपत्रिका अवैध होतील.
'1' पसंतीक्रम आवश्यक, इतर मात्र, ऐच्छिक
तुमची मतपत्रिका वैध ठरण्यासाठी पहिला पसंतीक्रम कोणत्याही एका उमेदवाराच्या नावापुढे '1' हा अंक नमूद करून नोंदविणे आवश्यक आहे. इतर पसंतीक्रम नोंदवणे केवळ ऐच्छिक आहे, बंधनकारक नाही, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.