

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : वीज मीटरशेजारी थेट मीटर बंद करणारे स्वतंत्र उपकरण लावून तालुक्यातील मोहरी रस्त्यावरील एका खडीक्रशरचालकाने आतापर्यंत कोट्यवधींची वीजचोरी केल्याची बाब उघडकीस आली आहे. संबंधित खडीक्रशरवर वसई, मुंबई, नाशिक अशा वेगवेगळ्या तीन ठिकाणांवरून आलेल्या महावितरणच्या भरारी पथकांनी संयुक्त छापा टाकून ही वीजचोरी पकडली.
गुरुवारी दिवसभर चाललेल्या या कारवाईत पथकांकडून संबंधित क्रशरचालकाला नेमका किती दंड करण्यात आला, त्याच्यावर कुठल्या कलमांन्वये कारवाई करण्यात आली याची माहिती मिळू शकली नाही.
संबंधित खडीक्रशरचालक अनेक वर्षांपासून मीटर बंद ठेवून चोरीच्या मार्गाने क्रशरसाठी थेट वीज वापरत असल्याची माहिती भरारी पथकांना मिळाली होती. नियोजनबद्ध सापळा रचून तिन्ही ठिकाणांहून आलेल्या पथकाने संयुक्त कारवाई केली. स्थानिक वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांना या कारवाईबाबत कुठलीही कल्पना देण्यात आली नव्हती. तालुक्यात सर्वांत मोठी वीजचोरी पकडल्याची ही घटना आहे. या कारवाईमुळे वीजचोरी करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.
तालुक्यातील मोहरी व हंडाळवाडी शिवारात मोठ्या प्रमाणात खडीक्रशर व्यवसाय सुरू आहे. या ठिकाणी असलेल्या एका खडीक्रशरवर वापरले जाणारे चार अधिकृत महावितरणचे व्यावसायिक विजेचे मीटर असून, त्यामधील एका मीटरला डिवाइस बसून ते बंद करण्यात आले होते. अन्य तीन मीटरमध्येही हेराफेरी केल्याचा संशय महावितरणच्या अधिकार्याला असल्याने ते तीन मीटर या भरारी पथकाने ताब्यात घेऊन त्याची पुढील तपासणीसाठी वीज प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. परिसरातील अन्य खडीक्रशर चालकांच्या मीटर्सचीही तपासणी या पथकांनी केली.
हे भरारी पथक अचानकपणे पाथर्डीत दाखल झाले. स्थानिक वीज वितरणच्या अधिकार्यांना या छाप्याची कोणतीही पूर्वकल्पनाही दिली गेली नव्हती. अतिशय गुप्तता या भरारी पथकाने बाळगून ही कारवाई केली.
वीज गळती होणारा तालुका म्हणून पाथर्डीचे नाव अग्रस्थानी आहे. वरिष्ठ पातळीवरून तालुक्यातील वीजगळती बंद करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागासह शहरात मोठ्या प्रमाणात वीजचोरी केली जाते. ग्राहकांना वीजचोरीचा मार्ग दाखवणार्या अनेकांनी आपले उखळ पांढरे करून घेतले आहे. भरारी पथकाचे अशा वीजचोरी करणार्यांवर व मार्ग दाखवणार्या एजंटावर बारीक लक्ष आहे.
हेही वाचा