

नेवासा: पुढारी वृत्तसेवा : वीज चोरीसाठी टाकलेले आकडे काढल्याच्या रागातून गोणेगाव (ता.नेवासा) येथे वायरमनला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. या प्रकरणी दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबादास दत्तात्रय रोडे व त्याची पत्नी अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. वीज चोरीला आळा घालण्याची मोहीम महावितरण कंपनीने हाती घेतली आहे. नगरचे अधीक्षक अभियंता काकडे यांच्या आदेशानुसार नेवाशाचे उपकार्यकारी अभियंता शरद चेचर यांच्या आदेशानुसार महावितरणचे पथक गोणेगावात गेले होते.
महावितरणचे कर्मचारी सयाजी गोडसे, शिवकुमार आचारी, बागुल, सचिन डाके, मोसीन साळवे, नितीन जाधव, संदीप कसबे, अभिजीत भाकरे असिस्टंट लाईनमन हरिभाऊ येळे हे थकबाकी व वीज चोरी पकडण्यासाठी गेले होते. गावात एकेठिकाणी वीज वाहक तारेवर आकडा टाकून वीज चोरी होत असल्याचे पथकाला दिसले. लाईनमन येळे यांनी खांबवर चढून आकडे टाकलेली वायर जप्त केली. वायर जप्त केल्याच्या रागातून अंबादास रोडे याने 'आकडे का काढले' अशी विचारणा करत शिवीगाळ करत धक्काबुक्की करत मारहाण केली. लाईनमन भाऊसाहेब येळे यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांत अंबादास रोडे व त्याच्या पत्नीविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. वायरमनला मारहाण करणार्यांविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी महावितरणच्या कर्मचार्यांनी केली आहे.
महावितरण कर्मचारी असुरक्षित
वीज चोरी पकडण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या पथकावर अनेकदा हल्ले होतात. थकबाकीदाराची वीज तोडली तरी हल्ले होतात. नेवासा तालुक्यात अशा घटना वाढल्या आहेत. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्यांमध्ये असुरक्षिततेची भावना बळावली आहे. त्याचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवरही होतो. अशा समाजकंटकांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी वीज वितरण कर्मचार्यांनी केली आहे.