

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा : थकीत वीज बिलाअभावी शेवगाव पाथर्डी प्रादेशिक पाणी पुरवठ्याचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. ही योजना बंद झाल्याने दोन लाख नागरिकांची पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. शेवगाव व पाथर्डी नगरपरिषेदेने त्यांच्याकडील थकबाकी भरण्यास काही प्रमाणात हातभार लावल्यास योजना पुन्हा सुरू होण्यास मदत होणार आहे.
अनेक वर्षांपासून शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील 51 गांवाची तहान भागवणारी शेवगाव पाथर्डी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची एक कोटी 85 लाख रुपये चालू व नऊ कोटी 85 लाख मागील वीज बिल थकबाकी असल्याने या योजनेचा बुधवारी (दि.1) सांयकाळी विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला.
यामुळे योजना बंद झाल्याने दोन्ही तालुक्यातील दोन लाख 10 हजार नागरिकांवर पाणीपाबाची वेळ आली आहे. घरातील रिकामे हंडे त्यांना घोर लावित आहेत. दोनच दिवसात ही योजना कधी सुरू होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, किमान वीज बिल भरण्याइतपत नगरपरिषद व ग्रामपंचायतीकडे असणारी बाकी वसुल होत नाही, तोपर्यंत योजना चालू होणे कठीण आहे.
सध्या उन्हाळ्याची चाहुल सुरू झाल्याने पाण्याचा वापर जास्त प्रमाणात सुरू झाला आहे. योजना बंद झाल्याने नागरिकांवर संकट ओढवले असून, पाण्यासाठी रानोमाळ फिरण्याची सवय मोडल्याने पाण्याचे काय? असा प्रश्न उभा राहिला आहे. योजना सुरू होण्यास दोन्ही नगरपरिषदेवर सर्वस्वी अवलंबुन असले, तरी दोन्ही शहरात नवीन योजना होणार असल्याने त्यांना थकबाकीचे फारसे गांभीर्य राहिले नाही. तसेच, शेवगाव शहराला अंतर्गत नियोजना अभावी 15 दिवसातून एकदा पाणी येत असल्याने लाभार्थी पाणीपट्टी भरण्यास दुर्लक्ष करतात. मात्र, लवकरात लवकर योजना सुरू करावी, अशी मागणी लाभार्थी करत आहेत.
कोणाकडे किती बाकी!
शेवगाव नगरपरिषदेकडे योजनेची आजपर्यंत पाच कोटी 86 लाख 61 हजार 643 रुपये, तर पाथर्डी नगरपरिषदेकडे दोन कोटी 56 लाख 47 हजार 55 रुपये थकबाकी आहे. तसेच, शेवगावच्या 32 गावच्या 26 ग्रामपंचायतीकडे दोन कोटी 79 लाख व पाथर्डीच्या 19 गावच्या 17 ग्रामपंचायतीकडे दोन कोटी 39 लाख 35 हजार 802 रुपये बाकी आहे.
काही ग्रामपंचायतींकडे मोठी थकबाकी
दोन्ही तालुक्यातील काही ग्रामपंचायतींकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असून, यात शेवगाव तालुक्यातील अमरापूर 34 लाख 48 हजार 170, वरूर 28 लाख 37 हजार, घोटण 25 लाख 45 हजार, मळेगाव-ने 10 लाख 49 हजार 920, ठाकुर निमगाव 11 लाख 12 हजार 760, वडुले बुद्रुक 10 लाख दोन हजार 500 रुपये, तर पाथर्डी तालुक्यातील माळी बाभुळगाव 37 लाख 68 हजार, पागोरी पिंपळगाव 30 लाख 21 हजार, सुसरे 12 लाख 17 हजार 490, साकेगाव 19 लाख 60 हजार 360, दुले चांदगाव चार लाख 85 हजार रुपये, अशी योजनेची थकबाकी आहे.