शेवगावचे भूमिअभिलेख कार्यालय भूमिगत !

शेवगावचे भूमिअभिलेख कार्यालय भूमिगत !

रमेश चौधरी : 

शेवगाव (नगर ) : शेतीच्या मोजणी अभावी भावाभावांचे डोके फुटत असून, जमिनीचे कुळच वादाचे मूळ. शेतजमीन किंवा भूखंडाची मुदतीत मोजणी होत नसल्याने भाऊबंदकीचे वाद वाढले आहेत. भूमिअभिलेखा कार्यालयातील अपुर्‍या कर्मचार्‍यामुळे तातडीची मोजणी कालावधी कक्षेतून पार झाली आहे. तालुक्यातील भूमिअभिलेखा कार्यालय भूमिगत झाल्याचे म्हंटलं तर वावगं ठरेल. शेतजमीन किंवा भूखंडाचे हिस्से बांध रेटारेटीने कमी जास्त झाल्याच्या अनेक तक्रारी आहेत. भाऊबंदकीच्या वादाचे मूळ यावरूनच सुरू असून, त्याचे वादावादीत रुपांतर होत आहे. तसेच, अनेक वेळा हाणामार्‍या, तर काही वेळेस खून करण्यापर्यंत मजल गेल्याचा इतिहास आहे.

कलीयुगात 'ज्याच्या हातात ससा, तोच पारधी,' अशी वृत्ती तयार झाल्याने घरांचे वासे फिरले आहेत. एकत्रित कुटुंबात आई-वडील वगळता आदरस्थानी असणार्‍या काही व्यक्ती भविष्यात स्वार्थाने शापित होतात आणि संचारलेल्या अहंकाराने वाटाघाटीत दुजाभाव करतात, असे पाहवयास मिळते. शेजारी-शेजारील शेतजमीन किंवा भूखंडाचे बांध टोकरून आपला मालकी हक्क प्रस्थापित करण्याची खोड बहुधा ग्रामीण भागात अधिक आहे.

यावरून अनेक वेळेस वाद होतात, तर हे वाद शेवटच्या टोकाला जातात. यातून कोर्ट-कचेर्‍यात जिरवाजिरवीची भूमिका घेतली जाते. अर्थात, अशा वादात तेल घालणारे खोडसाळ वृत्तीचे काही महाभाग प्रत्येक गावात असतात. अशा निकामी व्यक्तींच्या कुरापतीने मिटणारे वाद वाढल्याचा प्रत्यय अनेकांना आला आहे. वाद टाळले जावेत म्हणून भूमिअभिलेख कार्यालयामार्फत रितसर मोजणीद्वारे आपला हिस्सा कायम करण्याचे प्रयत्न होतात. त्यासाठी मोजणी फी भरली जाते, तरीही कालावधित मोजणी होत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत.
येथे दोनपैकी एकच एटीएस मशीन चालू आहे.

निधीअभावी दुसरी नादुरुस्त मशीन धुळखात पडली आहे. शासनाच्या नवीन धोरणाने आता, दोन रोहर मशीन आल्या आहेत. पंरतु काही जागेवर यास रेजंची अडचण तयार होते. त्यात परिपूर्ण तंज्ज्ञ कर्मचार्‍यांच्या उणीवने मुदतीत मोजणी होण्यास विलंब होतो. शासनाने मुदतीत मोजणी व्हावी, यासाठी नवीन मशीन खरेदी केल्या; मात्र कर्मचारी कमतरतेकडे दुर्लक्ष झाले. मुदतीत मोजणी पूर्ण करण्यासाठी याचीही दखल घेतली जावी अन्यथा वादाचे प्रमाण वाढत राहिल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

'शुल्क भरूनही मुदतीत मोजणी नाही'
सहा महिन्यानंतर मोजणी कालावधी असणार्‍या साधी मोजणीस एक हजार रुपये, तातडी मोजणीस चार ते सहा महिने कालावधी दोन हजार रुपये, आति तातडी मोजणी तीन ते चार महिने कालावधी तीन हजार रुपये, आति तातडी मोजणी एक ते तीन महिने कालावधी 12 हजार रुपये, असे शुल्क दोन हेक्टरपर्यंत आकारले जाते. त्यापुढे क्षेत्र असल्यास शुल्क ज्यादा भरावे लागते. हे शुल्क भरुनही मुदतीत मोजणी होत नाही, याची दखल घ्यावी, अशी मागणी मोजणीधारकांनी केली.

शेवगावच्या कार्यालयात चारच कर्मचारी
शेवगाव तालुक्याच्या भूमिअभिलेख कार्यालयात फक्त चार कर्मचारी आहेत. त्यामुळे कर्मचार्‍याअभावी मोजणीचा कालावधी लांबतो. अतितातडी मोजणी, तातडीच्या पद्धतीत जाते. या कार्यालयात 198 अर्ज पेडिंग आहेत. त्यात सुमारे 150 अतितातडी व 20 तातडीचे आहेत. महिन्याला 50 अर्जाची दाखल होतात. त्यात 30 निकाली, तर मनुष्यबळा अभावी 20 शिल्लक राहतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news