

भातकुडगाव : पुढारी वृत्तसेवा : पाटपाण्याचा टेलच्या शेतकर्यांना संघर्ष पाचविला पूजलेला आहे. अशातच पाटबंधारे अधिकारी व पाणी वापर संस्था पदाधिकार्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी हक्काच्या पाटपाण्यापासून वंचित राहत आहे. असाच प्रकार मुळा टेलच्या भातकुडगाव, खामगाव, हिंगणगाव, जोहरापूर टेलच्या भागात चालू आहे. पाणीवापर संस्थांंनी लाभार्थी शेतकर्यांना विश्वासात न घेता केवळ दोन तासांतच अधिकारी व संस्था सचिवांंच्या मनमानी कारभार करुन कल्पना न देता पाणी बंद केले आहे. काही ठिकाणी पाटपाणी मोकाट चालू असून, ओढ्या-नाल्यांना सोडलेले दिसत आहे. याबाबत संतप्त शेतकर्यांनी पाटबंधारे विभागाकडे तक्रार केली आहे.
मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना लाभधारक शेतकर्यांनी यासंदर्भात निवेदन दिले आहे. मायनर क्र. 12,13,14 वरील सर्व लाभधारक शेतकर्यांनी पाणी वापर सोसायटीकडे पाणीपट्टी भरून पाण्याची रितसर पाणी मागणी केली आहे. मात्र, पाटबंधारे अधिकारी व पाणी वापर सोसायटी सचिव यांनी मनमानी कारभार करीत कुठल्याही शेतकर्यांना कल्पना न देता, विश्वासात न घेता अवघ्या दोन तासांत चारीला पाणी सोडून ताबडतोब बंद केले. या सर्व प्रकाराची चौकशी करुन पाणी देण्याची व्यवस्था करावी अन्यथा, शेतकरी भातकुडगाव शाखेसमोर उपोषण करतील, असा इशारा शेतकरी संदीप बामदळे, मुकुंद जमधडे, अशोक देवढे, अशोक घुमरे, एकनाथ घुमरे, महादेव वणे, अशोक पंडित, दादासाहेब देवढे यांनी दिला आहे.