पाथर्डी: महसूल, पोलिसांच्या हातावर दिल्या तुरी; पकडलेला डंपर पळवून नेत चालक झाला पसार

पाथर्डी: महसूल, पोलिसांच्या हातावर दिल्या तुरी; पकडलेला डंपर पळवून नेत चालक झाला पसार

पाथर्डी तालुका, पुढारी वृत्तसेवा: महसूल अधिकारी व पोलिस कर्मचार्‍यांच्या हातावर तुरी देत अज्ञात वाहन चालकाने खडी भरलेला डंपर पळवला. पाथर्डी मंडळ अधिकारी रवींद्र शेकटकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकाविरोधात पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाथर्डी शहर हद्दीमधील चिंचपूर रोडवरील गुगळे पेट्रोल पंप येथे पांढ-या व राखाडी रंगाचा खडीने भरलेला डंपर क्रमांक एम.एच 04 जी आर 8584 उभा असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. त्यानंतर महसूलचे मंडळ अधिकारी रवींद्र शेकटकर, अभिजीत खटावकर, वैशाली दळवी, तलाठी हरिभाऊ सानप, मनोज खेडकर हे या ठिकाणी गेले असता गौण खनिजाबाबत रॉयल्टी वाहतूक परवानाची मागणी वाहन चालकाकडे केली.

परवाना नसल्याचे चालकाने सांगितले. त्यामुळे गौण खनिजाची वाहतूक ही अवैधरित्या विनापरवाना चोरुन केली जात आहे, असे स्पष्ट झाले.त्यानंतर वाहन तहसिल कार्यालय पाथर्डी येथे चालकाला घेण्यास सांगितले. मात्र वाहन नादुरस्त असल्याचे चालकाने सांगितल्याने तहसिलदार शाम वाडकर यांनी पोलिस मदत बोलावली.

जवळपास एक ते दीड तास सदर वाहन चालकाने डंपर तहसिल कार्यालय आणण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास वाहन चालक याने धक्का मारून डंपर तहसिल कार्यालय येथे घेतो. अशी तयारी दर्शवली. मात्र, उपस्थितांनी धक्का दिलेनंतर डंपर चालु होताच, त्यात असलेल्या खडीसह संबंधित डंपर तहसिल कार्यालय पाथर्डी येथे न आणता तो इतरत्र पळवून नेला. महसूल अधिकारी, कर्मचारी व पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. मात्र डंपर चालक हातावर तुरी देऊन डंपरसह पळून गेला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news