

करंजी (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटामध्ये शनिवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास नगरहून बीडकडे 25 टन रासायनिक खत घेऊन जाणार्या ट्रकवर चालकाचा ताबा सुटल्याने माणिक शहा पीरबाबा दर्ग्याजवळील धोकादाय वळणा जवळील 50 फूट खोल दरीत हा ट्रक जाऊन कोसळला. या अपघातामध्ये ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर क्लीनर गंभीर जखमी झाला आहे. नगरकडून बीडकडे करंजी घाटमार्गे रासायनिक खत घेऊन जात असलेल्या ट्रकचालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने करंजी घाटातील एका धोकादायक वळणावर खोल दरीत हा ट्रक जाऊन पडला.
या अपघातामध्ये ट्रक चालक शैलेश लोंढे (रा. नांदूरघाट, ता. केज) याचा जागीच मृत्यू झाला, तर क्लीनर प्रवीण गायकवाड (रा. शिरूर, ता. केज) गंभीर जखमी झाला असून, ट्रकचे व ट्रकमधील रासायनिक खताचे देखील मोठे नुकसान झाले. अपघाताची माहिती समजताच पाथर्डीचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी तत्काळ पोलिस फौजफाटा घटनास्थळी पाठवून त्या ठिकाणी मदत कार्य केले.
तसेच, महामार्ग पोलिस विभागातर्फे अधिकारी व कर्मचार्यांनी घटनास्थळी येऊन या अपघातामुळे करंजी घाटात खोळंबलेली वाहतूक कोंडी दूर केली. अपघातग्रस्त ट्रक दरीतून वरती काढून ट्रक चालकाचा मृतदेह पाथर्डीला पाठविण्यात आला. करंजी घाटात दरीत पडलेल्या ट्रकला पाहण्यासाठी प्रवाशांनी घाटात मोठी गर्दी केली होती. करंजी घाटातील माणिकशहा पीरबाबा दर्गा जवळील धोकादायक वळणावर नेहमीच जड वाहनांचे अपघात होतात. या ठिकाणचे धोकादायक वळण दुरुस्त केले तरच या ठिकाणी होणारे अपघात टळू शकतात, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
हे ही वाचा :