

लोणी : पुढारी वृत्तसेवा : सर्वसामान्य जनतेची दिवाळी गोड व्हावी; म्हणून शासनाने जाहीर केलेला 'आनंदाचा शिधा' चे 50 हजार 39 किट राहाता तालुक्यात पोहोचले आहेत. महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शिधावाटपास राहात्यापासून सुरुवात करण्यात आली आहे. राहात्यामधील सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानातून तहसीलदार कुंदन हिरे यांच्या हस्ते 'आनंदाचा शिधा किट' वाटपास काल सुरुवात झाली. यावेळी पुरवठा निरीक्षक भारत खरात, गोदामाला रिझवान शेख तसेच लाभार्थी उपस्थित होते.
'आनंदाच्या शिधा' कीटच्या माध्यमातून गरिबांना 100 रूपयांत प्रत्येकी एक किलो साखर, रवा, चणाडाळ व एक लिटर पामतेल वाटप केले जाणार आहे. राहाता तालुक्यात 50 हजार 39 किट प्राप्त झाले असून पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार व उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व गरिबांना आनंदाचा शिधा उद्यापर्यंत वाटप केला जाणार आहे, अशी माहिती तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली. शासनाने दिवाळीपूर्वी 'आनंदाचा शिधा' दिल्यामुळे आमची दिवाळी गोड झाली आहे. अशा भावना शिधा मिळालेले अरुण पवार, सुमन आरणे, बाळासाहेब बोरावके, शशी सोमवंशी या लाभार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
त्यांनी आत्मपरीक्षण करावे : मंत्री विखे
ज्यांनी मागच्या अडीच वर्षाच्या काळात राज्यातील जनतेवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आणली. त्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असून, 'आनंदाच्या शिध्यावर' बोलण्याचा नैतिकही अधिकार नसल्याची प्रतिक्रिया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.