नगर : गुरू-शिष्य जोडी तालुक्याचा विकास साधणार?

नगर : गुरू-शिष्य जोडी तालुक्याचा विकास साधणार?
Published on
Updated on

जवळा (नगर ) : पुढारी वृत्तसेवा :  बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून झालेल्या आमदार नीलेश लंके व माजी आमदार विजय औटी यांच्या मनोमिलनची खमंग चर्चा सर्वत्र होत असतानाच, ही गुरू-शिष्याची जोडी तालुका विकासासाठी लाभदायक ठरणार का? याकडे लक्ष राहणार आहे. बाजार समितीच्या मतदारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना दिलेल्या भरभरून मतदानातून तसा आशावाद व्यक्त केल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर गेल्या तीन-साडेतीन वर्षांत औटी-लंके यांचे विळ्या-भोपळ्याचे वैर सर्वश्रुत असताना, हे दोघे निवडणुकीच्या माध्यमातून एकत्र आलेच कसे काय? हा आश्चर्यचकित करणारा प्रश्न तालुक्यातील जनतेला पडला होता. याचे उत्तरही मतदारांनी मतदानाच्या माध्यमातून दिले असून, ही गुरू-शिष्याची जोडी विकासासाठी लाभदायक ठरेल, असेच उत्तर यातून मिळताना दिसत आहे.

बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर लढत तिरंगी होईल, यामध्ये बाजार समितीची सत्ता त्रिशंकू होईल, त्यानंतर कोण एकत्र येणार व कुणाची सत्ता येणार, हा राजकीय निरीक्षकांचा अंदाज फोल ठरला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी लंके-औटी यांनी दोन पावले मागे येत, मनोमिलन घडवून आणले. राजकीय व्यूहरचना करीत प्रभावी उमेदवार देत बाजार समितीची सत्ता 18-0 ने ताब्यात घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

खासदार डॉ सुजय विखे यांनी या बाजार समितीच्या निवडणुकीत लक्ष घातल्याने 'प्रवरे'चे नियोजन या निवडणुकीत असल्याने थोडा फार बदल होईल, असे वाटत होते. सत्ता लंके-औटी यांचीच येईल, मात्र पाच ते सहा जागा विखे प्रणित जनसेवा मंडळाला मिळतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, ही 'हवा' हवेतच विरली असून, महाविकास आघाडीच्या पद्मजा पठारे या तब्बल पाचशे मतांच्या फरकाने निवडून आल्या. तर, बाकीचे उमेदवार सुद्धा दोनशे ते तीनशेच्या आसपास मताधिक्य मिळवित निवडून आले. मात्र, बापू शिर्के यांचा अवघा तीन मतांनी झालेला विजय फारच धक्कादायक म्हणावा लागेल. राळेगण थेरपाळचे लोकनियुक्त सरपंच पंकज कारखिले यांनी प्रचाराची राळ उठवित, प्रत्येक मतदाराला दोन वेळा भेटत त्यांनी व सहकार्‍यांनी जोरदार प्रचार केल्याने त्यांना विजयासाठी चार ते पाच मते कमी पडली. कदाचित निघोज- अळकुटी जिल्हा परिषद गटात पाच-पंचवीस मतदारांनी त्यांना सहकार्य केले असते तर, विखे यांचा हा पठ्ठा सहज विजयी झाला असता. नीलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष असलेले बापू शिर्के यांचा अवघ्या तीन मतांनी काठावर झालेला विजय हा लंके प्रतिष्ठानला एक धक्काच आहे.

कारखिले यांनी सरपंच पदाच्या कार्यकाळात केलेली विकासकामे, त्यांचा तालुक्यातील संपर्क आणि खासदार विखे यांचे कट्टर समर्थक, बोलणे कमी व कामे जास्त, ही त्यांची कामाची पद्धत मतदारांना चांगलीच भावली आहे. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीत ते पंचायत समिती साठी इच्छुक आहेत. पंचायत समिती निघोज गण काही एवढा सोपा नाही. निघोजच्या दिग्गज उमेदवारांशी त्यांची लढत होणार असल्याने कारखिले यांना जवळपास अकरा ते साडेअकरा हजार मतदार असलेल्या निघोजशी संपर्क सातत्याने ठेवावी लागणार आहे.

बाजार समिती निवडणुकीत औटी-लंके यांचे उमेदवार सर्वपरिचित व बाजार समितीमध्ये तीन ते चार वेळा संचालक म्हणून संधी मिळालेले होते. विखे प्रणित मंडळात अरूण ठाणगे वगळता सर्व उमेदवार हे नवीन व फक्त त्यांच्या गाव व परिसरातील परिचित होते. याचाच फायदा मोठ्या प्रमाणात औटी-लंके प्रणित मंडळाला झाला आहे. शिवसेनेचे तालुका प्रमुख डॉ श्रीकांत पठारे यांच्या पत्नी पद्मजा पठारे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे, गांजीभोयरे सोसायटीचे चेअरमन व माजी सरपंच डॉ.आबासाहेब खोडदे, अर्बन बँकेचे चेअरमन अशोक कटारिया, माजी सभापती गंगाराम बेलकर यांनी मोठ्या प्रमाणात मताधिक्य घेऊन विजयश्री खेचून आणली.

माजी आमदार नंदकुमार झावरे यांचे पाठबळ, ही लंके-औटींच्या पॅनलची जमेची बाजू ठरली. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने तालुक्यात पाया मजबूत केला असून, या निवडणुकांत विखे तालुक्यात कशाप्रकारे लक्ष घालतात, यावर त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. खासदार विखे यांनी स्थानिक नेते व कार्यकर्त्यांना सर्वाधिक अधिकार देऊन या पुढच्या निवडणुका तुम्हालाच लढाव्या, लागतील असा इशारा देत त्याना ताकद देण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. बाजार समिती निवडणूक जरी एकतर्फी झाल्याचे जाणवत असले तरी, विखे प्रणित मंडळाला बर्‍यापैकी मतदान झाले आहे. आगामी सर्व निवडणुका या चुरशीने लढविल्या जाणार असून, महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा, ही लढत प्रत्येक निवडणुकीत पाहावयास मिळणार आहे.

विखे विरोधकांना सावधानतेचा इशारा
एक मात्र नक्की की, खासदार विखे यांनी बाजार समिती निवडणूक लढवून कार्यकर्त्यांचे संघटन मजबूत केले आहे. औटी व लंके यांच्याकडे सर्वाधिक ग्रामपंचायत व सोसायट्यांची सत्ता असूनही, विखे प्रणित मंडळाला 45 टक्के मतदान मिळाले. यातून विखे विरोधकांना सावध राहण्याचा इशारा मिळाला आहे.

शेतकर्‍यांना पाठबळ देण्याची गरज
बाजार समितीच्या माध्यमातून शेतकर्‍यांना सर्वाधिक पाठबळ देण्याची गरज आहे. गेल्या तीन ते चार वर्षांत कांद्याला भाव नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. इतर पिकांची सुद्धा तीच परस्थिती असून, शेतकरी राजाला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी नूतन संचालक मंडळावर फार मोठी जबाबदारी आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news