मुळा धरणातून जायकवाडीस विसर्ग बंद !

मुळा धरणातून जायकवाडीस विसर्ग बंद !
Published on
Updated on

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : मुळा धरणातून जायकवाडी धरणात समन्यायी कायद्यानुसार सोडलेले 2.1 टिएमसी पाण्याचे आवर्तन अखेर गुरूवारी थांबले, परंतु धरणाचे 11 दरवाजे उघडेच ठेवून बंधारे भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. धरणामध्ये शिल्लक 21 हजार 48 दलघफू पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. दरम्यान, अवकाळीने समन्यायीच्या आकडेवारीत बदल होऊन 1,960 दलघफू पाणी जायकवाडीस देण्यात आले. नगर जिल्ह्याची जलदायिनी ठरणार्‍या मुळा धरणावर यंदा समन्यायीची संक्रांत कोसळली. धरणातून 2.1 टिएमसी पाणी सोडण्याचा आदेश आला.

मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सायली पाटील, उप अभियंता विलास पाटील, शाखाभियंता राजेंद्र पारखे, सहाय्यक सलीम शेख यांच्या नियोजनानुसार 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वा. जायकवाडीच्या दिशेने विसर्ग सोडण्यात आला. रविवारी पाणी 2 हजार क्यूसेकने सोडलेल्या विसर्गात वाढ करीत सुमारे 6 हजार क्यूसेकपर्यंत जायकवाडीच्या दिशेने वाहिले. अशाच 'अवकाळी'चा धो- धो वर्षाव पाहता मुळा धरणातून सोडलेल्या पाण्याची कोणतीही अधिक नासाडी न होता बहुतांश पाणी जायकवाडीच्या साठ्यात जमा झाले. दरम्यान, गुरूवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास जायकवाडीस 2.1 टिएमसी पाणी पूर्ण सोडल्यानंतर बंधार्‍यावर फळ्या टाकण्यात आल्या. विसर्ग न थांबविता मुळा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या मुळा नदी पात्रावरील डिग्रस, वांजूळपोई, मानोरी, मांजरी या बंधार्‍यांमध्ये पाणी जमा करण्यासाठी आवर्तन सुरूच ठेवण्यात आले. काल शुक्रवारी उशिरापर्यंत आवर्तनाने बंधारे भरून देत विसर्ग थांबविणार असल्याची माहिती मुळा पाटबंधारे विभागाकडून मिळाली.

नगर व नाशिक जिल्ह्यातून धरणांवर 'समन्यायी'ची टांगती तलवार कोसळल्याने आगामी काळात दुष्काळाची दाहकता वाढली आहे. यावर्षी मुळा धरणाच्या पाणलोट व लाभक्षेत्रावर मान्सूनने अवकृपा दर्शविली. परिणामी धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही. त्यातच 'समन्यायी'चा तिढा सोसत 2.1 टिएमसी पाणी जायकवाडीस दिले. मुळा धरणातून शेतकर्‍यांसाठी एका आवर्तनाचे पाणी कमी झाल्याने मोठे जलसंकट उभे राहण्याची चिन्हे दिसत आहेत.

मुळा धरणातून शेतकर्‍यांसाठी पहिले रब्बीचे आवर्तन डिसेंबर महिन्यात 20 तारखेला सोडले जाणार होते, परंतु अवकाळी पावसाचा वर्षाव पाहता ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची आवर्तनाची मागणी लवकर होणार नसल्याचे चित्र दिसत आहे. मुळा पाटबंधारेकडून 1 जानेवारीपासून पहिले रब्बी आवर्तन सोडण्याची तयारी असल्याचे समजते. मुळातून 30 हजार हेक्टर क्षेत्रास उजव्या कालव्यासाठी पहिले रब्बीचे आवर्तन 45 दिवसांसाठी सोडण्याचे निश्चित झाले. यासाठी 5 हजार दलघफू पाणी जाणार होणार असल्याचे अपेक्षित आहे. उन्हाळी हंगामात 25 मार्च ते 13 एप्रिल असे 20 दिवसांचे आवर्तन निश्चित केले आहे. यासाठी 2.61 दलघफू पाणी उजव्या कालव्यातून पाणी जाणार आहे. मुळा डावा कालव्यासाठीही दोनच आवर्तने निश्चित झाले. डाव्या कालव्यातून पहिले रब्बी आवर्तन 20 डिसेंबर ते 15 जानेवारी 2024 पर्यंत सोडले जाणार होते. ते 1 जानेवारीपासून सुटेल असे चित्र दिसते. डावा कालव्यावर 4 हजार हेक्टर क्षेत्रास पहिल्या 27 दिवस आवर्तनास 600 दलघफू पाणी आरक्षित आहे. दुसरे आवर्तन 10 ते 28 फेब्रवारी असे निश्चित केले आहे.

समन्यायीने मारले, परंतु अवकाळीने तारले..!
मुळा धरणाच्या 11 दरवाजांद्वारे जायकवाडीला समन्यायी पाणी वाटपानुसार 2.1 टिएमसी पाणी गेले. धरण साठ्यात घट झाल्यानंतर अवकाळी बरसला. दरम्यान, या पावसाने 350 दलघफू पाण्याची वाढ झाली. राज्यभर अवकाळी कोसळल्याने 'समन्यायी'च्या आकड्यात घट होऊन 1,960 दलघफू पाणी जायकवाडीच्या दिशेने वाहिल्यानंतर विसर्ग थांबविण्यात आला.

मुळा धरणाचे यंदा पाण्याचे नियोजन..!
*मुळा धरण क्षमता-26 हजार दलघफू *मान्सून हंगाम अंतिम काळातील पाणी साठा-23, 157 दलघफू *मृत साठा-4500 दलघफू *गाळ साठा-2020 दलघफू *बाष्पीभवन-1187 दलघफू *पिण्यासाठी पाणी आरक्षण-1190 दलघफू *औद्योगिक मंजूर-250 दलघफू *वांबोरी पाईप चारी-406 दलघफू *भागडा चारी-60 दलघफू *म. फुले कृषी विद्यापीठास आरक्षित-372 दलघफू *जलाशय उपसा-299 दलघफू *कालव्यांद्वारे पिण्यास पाणी-800 दलघफू *आकस्मिक आरक्षण-1000 दलघफू* मुळा डावा सिंचन-1251 दलघफू* मुळा उजवा सिंचन-7619 दलघफू

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news