नगर : श्रीरामपूर डेपोच्या शिवशाही बसेसची दुरवस्था ; जादा गाडीभाडे देऊनही प्रवाशांची कुचंबणा

नगर : श्रीरामपूर डेपोच्या शिवशाही बसेसची दुरवस्था ; जादा गाडीभाडे देऊनही प्रवाशांची कुचंबणा

Published on

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा :  श्रीरामपूर डेपोमधील शिवशाही बसेसची दुरवस्था झालेली आहे. संबंधितांनी याबाबत तातडीने लक्ष घालून या बसेसची सुधारणा करावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे. श्रीरामपूर- पुणे मार्गावर शिवशाही या बसेस प्रामुख्याने चालविल्या जातात. चांगली सुविधा मिळेल या आशेेने इतर बसेसपेक्षा दीडपट जादा भाडे देऊन प्रवासी या बसेसमधून प्रवास करतात. मात्र या बसेसची स्वच्छता करण्याचे कर्तव्य श्रीरामपूर एसटी डेपोचे स्थानक प्रमुख किंवा त्यांचे कर्मचारी पार पाडत नसल्याचे या बसेसच्या अवतारातून कळत आहे.

श्रीरामपूर ते पुणे हे पाच ते साडेपाच तासांचे अंतर असल्याने आरामदायी प्रवासासाठी प्रवाशी जादा पैसे देऊन शिवशाहीला प्राधान्य देतात. परंतु बसमध्ये बसल्यानंतर 'भीक नको पण कुत्र आवर' अशी त्यांची अवस्था होते. रविवारी दुपारी 12 वाजता सुटणार्‍या बसची तर अत्यंत दैनावस्था होती. या बसच्या काचांवर बाहेरून धुळीचे थर जमलेले होते. आतून बाहेर काही सुद्धा दिसत नव्हते, तर आत मध्ये एसीच्या फॅन सभोवती धुळीचे थर जमलेले होते.

बस झाडलेली नव्हती, बसचे निळे पडदे वास मारीत होते. केवळ मजबुरी म्हणून प्रवासी या शिवशाहीतून प्रवास करीत होते. बसमध्ये महिला प्रवाशांची संख्या लक्षणीय होती. याबाबत चालक आणि वाहकांशी संपर्क साधून चर्चा केली असता बस धुण्याचे काम आमचे नाही ही जबाबदारी डेपोच्या कर्मचार्‍यांची आहे असे उत्तर त्यांनी दिले. खासगी बसेसच्या तुलनेत शिवशाही बसची एकूण व्यवस्था अतिशय भयावह आहे. याबाबत श्रीरामपूर डेपोच्या शाखा व्यवस्थापकाने लक्ष घालून दररोज शिवशाही बसेस धुवून पुसून फलाटावर लावल्या जातील याची दक्षता घेणे आवश्यक आहे. या संदर्भात काही जागरुक प्रवाशांनी जिल्हा नियंत्रकांकडे लेखी तक्रार केली आहे.
ते आता काय कारवाई करतात? याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

प्रवासी संघटनेने पाठपुरावा करावा
श्रीरामपूर डेपोमध्ये अनेक गाड्यांची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. शिवशाही बसेसचे घाणेरडे वातावरण प्रवाशांच्या जीवावर बेतत आहे. त्यातच बसेसची कमी संख्या, तुटलेल्या, नादुरुस्त झालेल्या बसेस, नवीन बसेस मिळणे गरजेचे आहे. यासाठी प्रवासी संघटनेने पाठपुरावा करावा, अशी मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news