अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : नव्या शासकीय विश्रामगृहाचे भूमिपूजन, भाजप पदाधिकार्यांचा मेळावा यानिमित्ताने शुक्रवारी नगरमध्ये आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार राम शिंदे यांच्यातील वाद मिटल्याचे जाहीर करण्यात आले. पत्रकार परिषदेत फडणवीस यांनीच हे 'पेल्यातले वादळ' होते, असे सांगून ते शमल्याचे सांगितले आणि त्यांच्या डाव्या-उजव्या बाजूला बसलेले दोन्ही नेते गालातल्या गालात हसले. त्यांच्या या हसण्याचीही चर्चा झाली.
इतकेच नाही, तर त्यानंतरच्या मेळाव्यातील भाषणांमधूनही दोन्ही नेत्यांनी वादळ अजून पेल्यात का होईना घोंगावत असल्याचे संकेत दिले. फडणवीस यांनी तेथे मात्र त्यावर मौन पाळले. याची चर्चा जिल्ह्यात झाली नसती तरच नवल होते! नुकत्याच झालेल्या बाजार समित्यांच्या निवडणूक काळात शिंदे-विखे वाद उफाळून आला. जामखेड बाजार समितीमध्ये विखे यांनी आमदार रोहित पवार यांच्या गटाला मदत केल्याचा आरोप करत आमदार शिंदे यांनी वरिष्ठांकडे तक्रारही केली होती.
त्यानंतरही 'विखे ज्या पक्षात जातात, त्या पक्षाच्या विरोधात काम करतात,' असे शरसंधानही त्यांनी साधले होते. त्यानंतर विखे सणसणीत उत्तर देतील, अशी शक्यता असताना खासदार डॉ. सुजय विखे यांनी नमती भूमिका घेतली. पवार-विखे वितुष्टाचा आजोबांच्या काळापासूनचा दाखला देत 'पवारांना विखे मदत करतात, यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही,' असे स्पष्ट केले आणि 'शिंदे यांचा गैरसमज झाला असावा,' असे म्हणत वरिष्ठांकडे याचे स्पष्टीकरण देऊ असे सांगितले. मंत्री विखे यांनी मात्र यावर बोलणेच टाळले.
अर्थातच शिंदे-विखे वादाला आणखी एक किनार आहे, ती म्हणजे शिंदे यांच्या लोकसभा निवडणूक लढण्याच्या इच्छेची. शिंदे यांनी ही इच्छाही थेट पत्रकार परिषदेतच व्यक्त केली. सध्या नगर मतदारसंघाचे खासदार असलेले डॉ. सुजय विखे यांच्यासाठी तो इशारा मानला गेला होता. पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले, की 'राम शिंदे आणि विखे पाटील यांच्यात वाद असला तरी चिंता करण्याचे कारण नाही, दोघांमधील वाद एका पेल्यातील वादळ होते, तेे आता शमले असून मी दोघांमध्ये मध्यस्थी घडवून आणली आहे.' त्यावर शेजारी बसलेले शिंदे आणि विखे गालातल्या गालात हसले.
दोन्ही नेत्यांच्या या गालातल्या गालात हसण्याला अनेक कंगोरे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पत्रकार परिषदेच्या आधी झालेल्या आढावा बैठकीत बसण्यासाठी शिंदे यांना खुर्चीच न मिळाल्याने ते मंचावरून उतरून निघाले, तेव्हाच या वादळाच्या वेगाचा अंदाज पाहणार्यांना आला होता. फडणवीस यांनी लगेच प्रसंगावधान राखत शिंदे यांना पुन्हा मंचावर बोलावले, आपल्या 'डाव्या बाजूला' खास जागा करून बसवून घेतले, तेव्हाही 'बघा, अजूनही ते डाव्या हातालाच' अशी मिश्किल टिप्पणी उपस्थितांमधून ऐकायला मिळाली. प्रसंगच तसा बाका होता. फडणवीस यांनी शिंदे यांना हाक मारल्यानंतर सुजय विखे यांनीही मंचावर बसण्याची विनंती शिंदेंना केली. या खुर्चीनाट्याचीही चर्चा नंतर रंगली.
आता नगरमधील फडणवीस यांचा आजचा शेवटचा कार्यक्रम होता पक्ष पदाधिकार्यांचा मेळावा. या मेळाव्यातही सारे नेते-पदाधिकारी फडणवीस यांच्यासमवेत आतल्या मार्गाने मंचापर्यंत पोहोचले, तेव्हा आमदार शिंदे एकटेच सभागृहातील गर्दीतून वाट काढत मंचाकडे जाताना दिसले. इथेही सूत्रसंचालकाला बाजूला सारत खासदार विखे यांनी सर्वांत आधी शिंदे यांनाच बोलायला पाचारण केले.
मेळाव्यातील या पहिल्याच भाषणात वाद शमल्याचा संदर्भ घेत शिंदे म्हणाले, की 'पेल्यातले वादळ पेल्याबाहेर येऊ नये याची काळजी आम्ही घेऊ, पण जे जनतेच्या मनात आहे, ते फडणवीस यांनी इथे बोलावे.' त्यानंतर लगेच बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, की 'रामभाऊ तुम्ही चिंता करू नका. आजही जबाबदारी माझी आहे आणि उद्याही जबाबदारी माझीच राहील.' या वक्तव्याचा नेमका अर्थ न कळल्याने कार्यकर्तेही एकमेकांकडे पाहत असतानाच 'पक्षाच्या आदेशाबाहेर कोणीही नाही' असेही विखे सांगून मोकळे झाले.
मात्र शिंदे यांना नेमका काय संदेश विखे यांनी दिला, याचा बोध न झाल्याची चर्चा कार्यकर्ते करत होते. नंतर अपेक्षित असतानाही फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात विखे-शिंदे वादावर चकार शब्दही काढला नाही, हेही कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्याशिवाय राहिले नाही. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीपर्यंत हे वादळ किती तीव्र होते, की खरोखर शमते, याची उत्सुकता सार्यांनाच आहे.