अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : मूळ आस्थापना बांधकाम विभागात असतानाही लघु पाटबंधारे, पाणी पुरवठा विभागात काम करणार्या 13 उपअभियंता, शाखा अभियंत्यांना सीईओंनी पुन्हा बांधकाम विभागात समायोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता प्रशासकीयदृष्ट्याही सुसुत्रता येणार आहे.
जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत यापुर्वी बांधकाम,जलसंधारण व पाणी पुरवठा विभागांची एकत्रित आस्थापना बांधकाम उत्तर विभागाकडे देण्यात आली होती.त्यामुळे वरील तीन विभागाचे स्वतंत्ररित्या विकल्प असलेले कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, सहायक अभियंता श्रेणी 2 यांनी संबंधित विभागाचा विकल्प असणार्या विभागात काम करणे अपेक्षित होते. मात्र संबंधितांपैकी काहीजण हे बांधकाम विभागाचा विकल्प असुनही त्यांना इतर विभागात नियुक्त्या दिल्या होत्या.
त्यामुळे संबंधित कर्मचारी हे लघु पाटबंधारे, पाणी पुरवठ्यामध्ये कार्यरत होते. मूळ आस्थापना बांधकामची असतानाही ते दुसरीकडे कार्यरत होते. काहींचे पगार बांधकाम, तर काहींचे काम करणार्या विभागातून निघत होते. मात्र प्रशासकीय कारवाई करताना नेमकी 'बांधकाम'ने करायची की, कार्यरत असलेल्या विभागांनी, याविषयी संभ्रम वाढला होता.
शिवाय सध्यस्थितीत बांधकाम,जलसंधारण व पाणी पुरवठा विभागांची स्वतंत्ररित्या नोकरी भरतीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाकडे विकल्पानुसार मंजूर, भरलेल्या व रिक्त पदांचा ताळमेळ बसणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्यांनी बांधकाम विभागाचा विकल्प दिलेला आहे, अशा 13 लोकांचे बांधकाम विभागांतर्गत समायोजन करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे.
के.बी.बनकर, आर.जी .पानसंबळ, एस.एस. साळुंके, के.डी.भोरस, एस.डी.माळवे, व्ही.आर. तागड, एम.आर. कसबे, एस. एस. कोटंबे, ए. टी. सोनवणे, के. एन. गऊल, के. जी. लायरे, एन. एम. वाघमारे, ए.बी. इंदोलिया.