नगर जिल्ह्याचे अहिल्यादेवी होळकरनगर नामकरण करण्याची मागणी; नामांतर कृती समितीचा मोर्चा

नगर जिल्ह्याचे अहिल्यादेवी होळकरनगर नामकरण करण्याची मागणी; नामांतर कृती समितीचा मोर्चा
Published on
Updated on

नगर; पुढारी वृत्तसेवा : अहमदनगर जिल्ह्याचे 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरनगर नामकरण करण्यासाठी नामांतर कृती समितीतर्फे काढण्यात आलेल्या नामांतर रथ यात्रेचा समारोप सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून करण्यात आला. जिल्ह्याचे नामांतर 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरनगर करण्यात यावे, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना देण्यात आले.

आमदार गोपीचंद पडळकर, आ.राम शिंदे, माजी मंत्री महादेव जानकर यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरनगर' करण्याची मागणी नागपूर हिवाळी अधिवेशनात लावून धरली होती. त्यानंतर राज्य शासनाने संबंधित विभागांना पत्र पाठवून प्रस्ताव दाखल करण्याचे निर्देश दिले होते. परंतु अहिल्यादेवी होळकरनगर यांच्या नावाचा प्रस्ताव पुढे पाठविण्यात आलेला नाही. त्यामुळे नामांतरण कृती समितीतर्फे 9 फेब्रुवारी 2023 रोजी चौंडी येथून नामांतर रथयात्रा सुरु करण्यात आली.

या रथयात्रेच्या माध्यमातून 14 तालुक्यांत नामांतर समितीला उत्स्फूर्तपणे पाठींबा मिळाला. या रथयात्रेचा समारोप सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून करण्यात आला. या मोर्चात कोल्हापूर येथील पट्टमकोडवली येथील पुजारी नारायण खाणू मोठे देसाई, कृती समितीचे विजय तमनर, राजेंद्र तागड, काका शेळके, निशांत दातीर, विनोद पाचारणे, अ‍ॅड.अक्षय भांड, ज्ञानेश्वर बाचकर, अशोक कोळेकर, अण्णासाहेब बाचकर, शारदा ढवण, दत्तात्रय खेडेकर, अशोक विरकर, राजेंद्र पाचे, डी.आर. शेंडगे, अशोक होनमाने, भगवान जर्‍हाड बाबासाहेब तागड, सचिन डफळ यांच्यासह समाजबांधव मोठया संख्येने सहभागी झाले होते.
राज्य शासनाला प्रस्ताव पाठवावा, असे निवेदन भक्ती तमनर, आदिती पाचारणे, शोभा दातीर, श्रृतीका तमनर, पुजा ढवण, दिव्या ढवण यांनी जिल्हाधिकारी सालीमठ यांना दिले.

…तर अधिवेशनावर विराट मोर्चा
जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेल्या मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव अहमदनगर जिल्ह्यास दिले तरच खर्‍या अर्थाने त्यांच्या कार्याचा उचित गौरव होणार आहे. या नामांतर लढ्यासाठी पहिले पाऊल पडले असून, या पुढील काळात विधिमंडळ अधिवेशनावर समाजबांधवांचा विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा नाराणय खाणू मोठे देसाई यांनी दिला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news