नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा नगर तालुक्यातील जेऊर शिवारात पेरूच्या बागेला लावलेल्या तारेच्या कंपाउंडमध्ये अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.23) घडली. जेऊर शिवारातील नंदकुमार मगर यांच्या शेतात पेरूच्या बागेची लागवड करण्यात आली आहे. रानडुकरामुळे बागेचे नुकसान टाळण्यासाठी बागेला तारेचे कंपाउंड करण्यात आले असून, कंपाऊंडच्या तारेमध्ये अडकून बिबट्याचा मृत्यू झाला. घटनास्थळी उपवन संरक्षक सुवर्णा माने, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल मनेष जाधव, वनरक्षक श्रीराम जगताप, तसेच वन कर्मचार्यांनी तारेचे कंपाऊंड तोडून बिबट्याचा मृतदेह बाजूला काढला. पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अनिल कराळे यांनी शवविच्छेदन केले.
जेऊर परिसरात दोन वर्षांपासून बिबट्यांनी धुमाकूळ घातला असून, अनेक पाळीव प्राण्यांची शिकार करण्यात आली आहे. तसेच धनगरवाडी येथे एकावर बिबट्याने हल्ला केला होता. इमामपूर परिसरातील महादेवाची खोरी, चापेवाडी येथील मेर, डोणी परिसर, पिंपळगाव तलाव, ससेवाडी, बहिरवाडी, डोंगरगण, भवानी माता मंदिर, माळखास परिसरात बिबट्याने वारंवार दर्शन दिले आहे.
जेऊर पट्ट्यात हरणांची, तसेच रानडुकरांची वाढती संख्या, डोंगरदर्या, मुबलक पाणी यामुळे बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते. यापूर्वी नगर औरंगाबाद महामार्गावर जरे वस्ती परिसरात रस्ते अपघातात बिबट्याचा मृत्यू झाला होता.
तसेच उदरमल शिवारात विहिरीत पडून बिबट्या मरण पावला होता. काल तारेच्या कंपाऊंडमध्ये अडकून बिबट्याचा मृत्यू झाला आहे. मृत झालेला बिबट्या हा नर जातीचा असून अंदाजे एक वर्षे वयाचा असल्याचे वन विभागाच्या वतीने सांगण्यात आले. दोन वर्षांत तीन बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. शेंडी येथील रोपवाटिकेत बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
वनमित्र पथकाची मदत
तारेच्या कंपाउंडमध्ये बिबट्या अडकल्याचे दिसताच त्याची माहिती वनमित्र पथकाला मिळाली. वनमित्र पथकाचे पत्रकार शशिकांत पवार, बंडू पवार, रघुनाथ पवार, मायकल पाटोळे, हर्षल तोडमल, आकाश तोडमल, संगम पाटोळे यांनी घटनास्थळी जाऊन वनविभागाला मदत केली.
जेऊर परिसरात बिबट्याचा वावर आढळून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. बिबट्या दिसल्यास त्याची छेड काढू नये. वन विभाग जनजागृती करीत असून शेतकरी तसेच लहान मुलांची काळजी घ्यावी.
-मनेष जाधव, वनपाल, जेऊरजेऊर पंचक्रोशीत शेतातील पिकाला पाणी देण्याचे काम सुरू आहे. रात्रीच्या वेळी शेतकरी पिकाला पाणी देत असतात. जेऊरमध्ये बिबट्याचा वावर आढळून येत असून शेतकर्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. वन विभागाच्या सूचनांचे पालन करावे.
-बंडू पवार, माजी उपसरपंच, जेऊर