

कोळगाव, पुढारी वृत्तसेवा: नगर-दौंड ते वासुंदे फाटा या महामार्गावरील कोळगाव येथील कण्हेरवळ परिसरात मागील दोन वर्षांपासून संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यावरून रखडलेल्या रस्त्याचा कामाची पोलिस बंदोबस्तात तसेच महसूल प्रशासनाच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. यावेळी तक्रारदाराला या जमिनीचा मोबदला शासन नियमानुसार लवकरात लवकर देण्यात येईल, असे पत्र रस्ते विकास महामंडळाच्या उपअभियंत्यांनी दिले.
नगर-दौंड ते वासुंदे फाटा या 93 किलोमीटरच्या टप्प्याच्या काँक्रिटीकरण कामासाठी सुमारे 1 हजार 50 कोटींचा निधी मंजूर होऊन आता रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तालुक्यातील कोळगाव परिसरातील कण्हेरवळ या ठिकाणी गट नं. 422 साठी पहिल्या अधिसूचनेनुसार 5 गुंठे क्षेत्र संपादित झाले होते. त्यानुसार 5 गुंठे क्षेत्राचा अवार्ड मंजूर होऊन त्याचा मोबदला वाटप करण्याची प्रक्रिया सुरू होती. खा. डॉ.सुजय विखे यांच्या आदेशाने या ठिकाणी फेरमोजणी केली असता, रस्त्याच्या डाव्या बाजूला आणखी 1.5 गुंठा क्षेत्र संपादनात येत असल्याचे निदर्शनास आले होते. या सर्व क्षेत्राचा मोबदला मिळाला नसल्याने या रस्त्याचे काम रखडले होते.
या अपूर्ण रस्त्याचे काम दि.29 ऑगस्ट रोजी सकाळी पोलिस बंदोबस्तात सुरू करण्यात आले होते. त्यानंतर याठिकाणी स्थानिकांनी काम थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यांना रस्ते विकास महामंडळाच्या उपअभियंत्यांनी संपादित केलेल्या 5 गुंठे जमिनीचा मोबदला शासन नियमानुसार लवकरात लवकर देण्यात येईल. तसेच, उर्वरित 1.5 गुंठा क्षेत्राचे अवार्ड देखील प्रगतीत असून, त्याचा मोबदलाही लवकरच संबंधितांना अदा करू, असे लेखी पत्र दिल्याने रस्त्याचे काम सुरू झाले. यावेळी महसूल विभागाचे नायब तहसीलदार नीलेश वाघमारे, पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र चाटे, अमित माळी यांच्यासह महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
याबाबत संबंधित शेतकरी अनिल लगड म्हणाले, रस्त्याच्या कामाबाबत आम्हाला पूर्वकल्पना दिलेली नाही. चार वर्षांपासून योग्य मोबदला देण्याचे आश्वासन दिलेले आहे. आम्हाला जमिनीचे योग्य मूल्य मिळाल्याशिवाय हा संघर्ष थांबणार नाही. सध्याचे रस्त्याचे काम मान्य नसून, केवळ पाच गुंठ्याच्या मोबदल्याचे आश्वासन दिले आहे.
आजपर्यंत सदर ठिकाणी अनेक अपघात झाले असून, अनेकांना आपले अवयव गमवावे लागले. काही जण कायमचे जायबंदी झाले. अनेक गाड्यांचे नुकसान झाले. त्यामुळे सदर रस्ता दुरुस्ती होणे गरजेचे होते. या रस्त्याबरोबरच लोणी गेटपासून एक ते दीड किलोमीटर अंतराचा रस्ता सुद्धा करणे गरजेचे असल्याचे मत परिसरातील ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.