

नगर; पुढारी वृत्तसेवा : क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून एकीचे दर्शन घडते. खेळाच्या माध्यमातून व्यायामाची गोडी निर्माण होते. या धकाधकीच्या जीवनात मनुष्याचे आरोग्य सदृढ, निरोगी व आनंदी राहण्यासाठी दररोज व्यायामाची गरज आहे. मनुष्य नोकरी करताना त्याच्या जीवनात ताण तणाव असतो. मनपाचे अधिकारी व कर्मचारी दररोज नगरकरांना विविध सुविधा उपलब्ध करून देत असतात. त्यांच्या माध्यमातून समाजाची सेवा केली जाते. या कर्मचार्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून क्रीडा महोत्सवाचे आयोजन केल्याचे प्रतिपादन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले.
नगर महानगरपालिकेतर्फे आयोजित क्रीडा महोत्सव स्पर्धेचे उद्घाटन महापौर शेंडगे यांच्या हस्ते झाले. यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे, महिला बालकल्याण समिती सभापती पुष्पा बोरूडे, उपसभापती मीना चोपडा, माजी नगरसेवक संजय चोपडा, शहर अभियंता श्रीकांत निंबाळकर, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, डॉ. सतीश राजुरकर, क्रीडा अधिकारी फिलिप्स, आस्थापन विभाग प्रमुख अशोक साबळे, मेहेर लहारे, शेखर देशपांडे, अभियंता मनोज पारखे आदी उपस्थित होते.
आयुक्त डॉ.पंकज जावळे म्हणाले, महानगरपालिकेने पदाधिकारी, अधिकारी व कर्मचार्यांसाठी क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले. यामध्ये विविध खेळाच्या स्पर्धा झाल्या. अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांनी प्रास्तविक केले. क्रीडा अधिकारी फिलिप्स यांनी आभार मानले.