

बोटा : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील पठार भागातील आंबी खालसा गावाअंतर्गत असलेल्या चाळीस ते पन्नास घरांच्या लोकवस्तीतील गणपिरदरा येथील अंगणवाडी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर दोन ओढे प्रवाहित आहे. त्या रस्त्यावरील पुलाची उंची कमी असल्याने या पुलावरून पाणी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचे चित्र सध्या या परिसरात दिसून येत आहे.
तालुक्यातील पठार भागात वरुणराजा अगदी मनोसोक्त बरसत असल्याने पठार भाग जलमय झाला आहे. त्यात आंबी खालसा गावाअंतर्गत गणपिरदरा पाझर तलाव परिसरातील जवळे बाळेश्वर, सारोळे पठार, वरूडी पठार, डोळासणे, माळेगाव पठार पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसाने गणपिरदरा पाझर तलाव ओसंडून वाहू लागला आहे. या पाझर तलावाचे रहाटीच्या ओढ्याद्वारे पाणी वाहत असल्याने गणपिरदरा वस्तीकडे जाण्यासाठी ओढ्याला पाणी आल्याने या ओढ्यावरील पुलावरून पाणी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे गणपीरदरा वस्तीवरील अंगणवाडी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पहिली ते चौथी पर्यंतच्या चिमुकल्या विद्यार्थ्याने सोबत शिक्षक, पालक, ग्रामस्थांना ये-जा करताना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
या रहाटीच्या ओढ्यावर पंधरा वर्षांपूर्वी सीडीवर्क पूल बांधण्यात आला होता. परंतु या पुलाची उंची कमी असल्या कारणाने दरवर्षी पावसाळ्यात या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाहतो.अनेकदा पाण्याचा प्रवाह वाढल्यास शाळेत विद्यार्थी व शिक्षकांना जाणे शक्य होत नाही. मग पुलाच्या अलीकडे एखाद्या शेडमध्ये ह्या विद्यार्थ्यांची शाळा भरवली जाते. संबंधित विभागाने पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी आहे.
गणपीरदरा वस्तीकडे जाणार्या रस्त्यासाठी निधी दिला आहे. येथील पुलाची पाहणी करून त्यासाठी निधी उपलब्ध करून तेही काम मार्गी लावू.
– आमदार डॉ. किरण लहामटे
मी चार वर्षापासून या शाळेवर काम करते. शाळेचा पट संख्या वीस आहे. दरवर्षी पावसाळ्यात या पुलावरून पाण्याचा प्रवाह वाढतो. त्यामुळे य पुलावरून विद्यार्थ्यांना पलीकडे शाळेत नेणे शक्य होत नाही. पाण्यातून जाणे धोकादायक वाटते. मग आम्ही अलीकडे वस्तीवरच शाळा भरवतो. यावेळी विद्यार्थ्यांची गैरसोय होते. तरी या पुलाची उंची वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे कायम स्वरुपी शाळेचा प्रश्न मिटून जाईल – शांता हडवळे, मुख्याध्यापिका