रुईछत्तीशी : पुढारी वृत्तसेवा : रोहिणी, मृग नक्षत्र पूर्णपणे कोरडा गेला आहे. यामुळे गुंडेगाव, राळेगण, गुणवडी, रुईछत्तीशी, वडगाव परिसरात शेतकरी हवालदिल झाला आहे. नगर तालुक्यात सर्वाधिक बंधारे गुंडेगाव आहेत. जास्त पाऊस झाल्यानंतर हे सर्व बंधारे भरतात आणि ओव्हरफ्लो झाल्यानंतर राळेगण, गुणवडी, रुईछत्तीशी परिसरातील नदी नाल्यांना पाणी येते. पाऊस लांबल्याने बंधारे कोरडेठाक पडले आहेत. गुंडेगाव परिसरातील 500 ते 700 हेक्टर क्षेत्र या बंधार्यांवर अवलंबून आहे. जवळपास 30 ते 35 बंधारे या गावात असून, डोंगरावर पडणारे सगळे पाणी बंधार्यात येऊन पिकांना उपयोगी येते. पाऊस लांबल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. कापूस, सोयाबीन, बाजरी, मका पिकांची परिसरात मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. परंतु, या सर्व पिकांच्या पेरणीची वेळ आता जवळपास निघून गेली आहे.
गुंडेगाव व रुईछत्तीशी परिसरातील उद्योग व्यवसायांवर ही मोठा परिणाम झाला आहे. पाऊस चांगला होऊन शेतकर्यांना उत्पन्न साधले तरच देवाणघेवाण वाढते. सर्व उद्योग व्यवसाय शेतीवर अवलंबून असल्याने उद्योगधंदे पूर्णपणे कोसळून गेले आहेत. जनावरांच्या चार्याचा मोठा प्रश्न आहे. पुढील 15 ते 20 दिवसांत पाऊस आला नाही, तर या भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होणार आहे.
बंधारे कोरडे, शेतकर्यांच्या हाताला काम नाही, जनावरांच्या चार्याचा प्रश्न या सर्व गोष्टींमुळे शेतकरी कर्जबाजारी होतो. पावसाने वेळेवर साथ दिली, तर शेतकर्यांच्या सर्व गोष्टी सुकर होतात; परंतु आता पाऊस लांबल्याने शेतकर्यांचे आकाशाकडे डोळे लागले आहेत. आठ दिवसांपूर्वी पाऊस आला होता;परंतु त्याने जमिनीची भूक भागलेली नाही.
जनावरांना चारा विकत घेण्याची वेळ
जनावरांना विकत चारा घालण्याची वेळ आली आहे. परिसरात दूधव्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहे. दूधावर शेतकर्यांची आर्थिक मदार अवलंबून आहे. दूध व्यवसायही कमी होऊन शेतकरी आर्थिक अडचणीत येणार आहे.