शेवगाव : दोन दिवसांत नुकसानीचे अहवाल

शेवगाव : दोन दिवसांत नुकसानीचे अहवाल

शेवगाव तालुका(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : पावसाचा खंड पडल्याने प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी शासनाच्या आदेशाने नजर अंदाज सर्वेक्षण करण्यात येत आहे. रॅण्डम पद्धतीने बोधेगाव, एरंडगाव, भातकुडगाव मंडळात संयुक्त समिती दोन दिवसांत जिल्हाधिकारी यांना नुकसानीचे मूल्यमापन अहवाल सादर करणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात जून ते 18 ऑगस्ट दरम्यान पावसाचा खंड पडल्याने खरीप पीक उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे.

त्यात आता जवळपास तीन आठवड्यांपासून पावसाचा खंड पडल्याने कोरडवाहू खरीप पिके गेल्यात जमा आहेत. पाऊस नसल्याने पिकांची वाढ खुंटली असून, त्यास मोडण्याशिवाय पर्याय उरला नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत शासनाने पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नुकसान भरपाई ठरविण्यासाठी तालुका कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुका स्तरावर विमा कंपनीचे प्रतिनिधी व तलाठी, कृषी सहाय्यक असे राज्य शासनाचे अधिकारी यांची संयुक्त समिती स्थापन केली आहे.

सदर समिती अधिसूचित क्षेत्रातील पिकांच्या एकूण पेरणी क्षेत्रापैकी पाच टक्के क्षेत्राचे नजर अंदाज सर्वेक्षण करूण नुकसानीचे मूल्यमापन करणार आहेत. रॅण्डम पद्धतीने निवडलेल्या दहा वेगवेगळ्या ठिकाणाच्या पिकांची पाहणी करून नुकसानीची टक्केवारी निश्चित करणार आहेत. शेवगाव तालुक्यातील आठ महसूल मंडळापैकी बोधेगाव, एरंडगाव, भातकुडगाव या तीन मंडळात सदर सर्वेक्षण चालू आहे. दोन दिवसांत जिल्हाधिकारी यांना याचा अहवाल सादर झाल्यानंतर प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा निर्णय होण्याची शक्यता आहे. यासाठी शेतकर्‍यांनी ई-पीक पाहणी करणे आवश्यक आहे.

दरम्यान, संपूर्ण तालुक्यात पावसाचा खंड पडल्याने तूर, कपाशी, बाजरी, मूग, सोयाबीन, उडीद, भुईमूग, मका अशी खरीप पिके भुईला खेळत आहेत. तीन मंडळात सर्वेक्षण होत असले तरी इतर शेवगाव, ढोरजळगाव, चापडगाव, मुंगी व दहिगाव-ने मंडळातही पिकांची यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही.

सर्व मंडळातील पिकांचे सर्वेक्षण करा

पावसाच्या सततच्या खंडामुळे तालुक्यातील सर्वच मंडळातील पेरणी झालेल्या खरीप क्षेत्रातील पिकांची परिस्थिती बिकट झालेलली आहे. त्यामुळे सर्व मंडळातील पिकांचे सर्वेक्षण करून प्रधानमंत्री पीक विमा योजनेबरोबर शासनाचे अनुदान जाहीर करावे, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news