

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : तीन दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यात झालेल्या गारपिटीसह अवकाळी पावसाने प्राथमिक अंदाजानुसार 12 गावांमध्ये 1 हजार शेतकर्यांचे सरासरी 400 ते 450 हेक्टरवरील कांदा, टोमॅटो, गहू, हरभरा, चारा, भाजीपाला पिकांसह फुलशेतीची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. अवकाळीमुळे शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे. संगमनेर तालुक्यात यंदा चांगला पाऊस पडला. त्यामुळे शेतकर्यांनी गहू, हरभरा, कांदा, टोमॅटो व भाजीपाला पिकातून चार पैसे जास्त पदरात पडतील, हे स्वप्न डोळ्यासमोर ठेवले. महागडे बियाणे खरेदी करून गहू-हरभर्याची पेरणी तर कांदा- टोमॅटोची लागवड केली. दिवस- रात्र पाणी देऊन पिके वाढविली.
ऐन पीक काढणीच्यावेळी वादळ-वार्यासह अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. पावसाने शेतातील उभ्या गव्हाचे पीक आडवे झाले. काहींनी काढलेला गहू पावसात भिजला. कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतात साठवलेला कांदा पावसात भिजला. काहींच्या शेतातील कांद्यासह टोमॅटोला गारांचा फटका बसल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले.
तालुक्याच्या पठार भागात पिंपळगाव देपा, कर्जुले पठार, बांबळेवाडी, डोळासणे, गुंजाळवाडी पठार, वरुडी पठार, कौठे मलकापूर, लोहारे, कसारे, कौठेकमळेश्वर, मेंढवण, निळवंडे, करुले या 12 गावांमध्ये 18 मार्च रोजी अवकाळी पावसासह गारा पडल्यामुळे शेतात सोंगून ठेवलेल्या गव्हासह साठवलेला कांदा व टोमॅटो, डाळिंब, भाजीपाला, चारा पिकांची मोठी हानी झाल्याने बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
अगोदरच कर्जाच्या खाईत लोटलेला, शेतमालास मिळणारा कवडीमोल भाव या दुहेरी संकटामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीस आला आहे. त्यामध्ये आता अवकाळी व गारपिटीचे संकट आल्यामुळे शेतकरी पुर्णतः उध्वस्त झाला आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या पिकांचे तत्काळ पंचनामे करावे. लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी 12 गावांतील नुकसानग्रस्त शेतकर्यांनी केली आहे. ऐन उन्हाळ्यात अवकाळीने तडाखा दिल्याने बळीराजा हैराण झाला आहे.
तीन दिवसांमध्ये पंचनामे पूर्ण होईल..!
संगमनेर तालुक्यात गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाने शेतमालाचे
मोठे नुकसान झाले. 12 गावांमधील नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या पिकाचे पंचनामे करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांनी तत्परता दाखविली. पंचनामे करण्याचे काम दोन ते तीन दिवसांमध्ये पूर्ण होईल, असे तहसीलदार अमोल निकम व तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले.