नगर : सहा वर्षांत सायबर क्राईम चौपट ! भविष्यात हे प्रमाण वाढण्याचा धोका

नगर : सहा वर्षांत सायबर क्राईम चौपट ! भविष्यात हे प्रमाण वाढण्याचा धोका
Published on
Updated on

श्रीकांत राऊत : 

नगर : स्मार्ट सिटीच नव्हे तर गावखेडेही आता '5जी' कनेक्टीव्हीटीच्या कवेत येऊ पाहते आहे. वाढत्या इंटरनेट वापरामुळे आयुष्य सहज आणि सोपे झाले असले तरी ते तितकेच धोकादायकही झाल्याचे दिसते. सायबर गुन्ह्यांत होणारी वाढ धडकी भरणारी असल्याची धक्कादायक आकडेवारी 'पुढारी'च्या हाती आली आहे. गत सहा वर्षांत सायबर गुन्हे चौपटीने वाढल्याचे त्यातून समोर आले. गत सहा वर्षांत तब्बल सहा हजार 525 तक्रारींची नोंद पोलिस दफ्तरी झाली असून 156 गुन्हे दाखल झाले आहेत. 2021-2022 या वर्षभरात सायबर दरोड्यात तब्बल दोन कोटी 60 लाख 91 हजार रुपयांनी सर्वसामान्यांची फसवणूक झाली. मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहराप्रमाणेच नगरमध्ये सायबर भामट्यांनी आपले पाय घट्ट करण्यास सुरूवात केली असून, त्यांना पोलिसांनी वेळीच पायबंद न घातल्यास भविष्यात हे प्रमाण वाढण्याचा धोका आहे.

सायबर फसवणुकीचे फंडे

बोगस साईटवरून फसवणूक
स्वस्तात वस्तू देण्याचे आमिष दाखवून बोगस वेबसाइट, अ‍ॅप्स् तयार केले जातात. त्यावर स्वस्तात वस्तू विक्रीसाठी दाखवून खात्यातून पैसे उकळले जातात.

क्रिप्टो करन्सी, शेअर मार्केट
बिटकॉईन, इथरम, सोलाना अशा क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक केल्यास ज्यादा परतावा देण्याचे आमिष दाखविले जाते. तसेच शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली दुप्पट परतावा देण्याचे सायबर चोर सांगतात.

लोन अ‍ॅपचा धुमाकूळ
शून्य टक्के व्याजाने वर्षभरासाठी कर्ज मिळेल, अशा जाहिराती करून लोन अ‍ॅप बाजारात आणले जातात. ते डाऊनलोड केल्यानंतर तुमचा सर्व पर्सनल डेटा चोरी करून फसवणूक केली जाते.

सोशल मीडियावरून ब्लॅकमेलिंग
व्हॉटस् अ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामवर मुलीच्या नावे बनावट अकाऊंट तयार केले जाते. त्यानंतर ओळख वाढवून व्यक्तिगत माहिती, खासगी फोटो पाठविण्याचे सांगितले जाते. त्यानंतर छेड काढणे, ब्लॅकमेल करणे हे प्रकार घडतात.

तोतयेगिरी मोठा ट्रॅप
आर्मी ऑफिसर बोलतो, सैन्यात नोकरी लावून देतो, पोलिस बोलतो, महावितरण अधिकारी बोलतो, बँकेचा अधिकारी बोलतो, कंपनीचा मालक बोलतो, अशी तोतयेगिरी करून अनेकांची फसवणूक झाल्याचे तपासात उघड झाले आहे.

सायबर गुन्ह्यांत वाढ झाली आहे. त्यासोबतच तक्रारी आल्यानंतर गुन्हे दाखल करून घेण्याचे प्रमाणही वाढले आहे. सोशल मीडियाच्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सायबर फसवणूक झाल्यानंतर तत्काळ पोलिस ठाण्यात येऊन नागरिकांनी तक्रार द्यावी.
                – ज्ञानेश्वर भोसले, पोलिस निरीक्षक,  सायबर पोलिस ठाणे, नगर

अशी घ्या काळजी
अनोळख्या क्रमांकावरून कॉल, मेसेज आल्यास माहिती देऊ नका
मोबाईलमध्ये लोन अ‍ॅप डाऊनलोड करू नका
पैसे गुंतवा, ज्यादा पैसे कमवा, या आमिषाला बळी पडू नका
फसवणूक झाल्यास तत्काळ सायबर पोलिसांत तक्रार द्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news