सायबर क्राईमचा नवा फंडा, सर्वसामान्यांना गंडा!

सायबर क्राईमचा नवा फंडा, सर्वसामान्यांना गंडा!
Published on
Updated on

राहुरीः पुढारी वृत्तसेवा : चुकीच्या पद्धतीने संदेश, कॉलद्वारे पैशांची लूटमार करण्याचा नवा फंडा गुन्हेगार अंमलात आणत असल्याचे समोर येत आहे. विविध कृलुप्त्यामध्ये अडकवत अलगदपणे पैसे काढून घेण्याचे प्रकार आता नित्याचे झाले आहेत. वांबोरी येथील एका व्यक्तीला बँक व्यवहाराच्या माहितीवर विश्वासात घेत 1 लाख 24 हजार रूपयांना गंडा घातल्याचा प्रकार नुकताच घडला आहे.
बँकेतून पैसे काढणे, वेगवेगळ्या ट्रीकमध्ये अडकवित पैशाची उकळण करणे, सोशल मीडियामध्ये लिंक टाकून देत मोबाईलच्या माध्यमातून बँकेतून पैसे परस्पर लांबवणे असे प्रकार नित्याचेच घडत आहे.

पोलिस ठाण्यात तसेच सायबर क्राईम विभागाकडे तक्रार दाखल करून घेतली जाते. परंतू आरोपी परराज्यातील व मोठे हॅकर असल्याचे सांगत तपास लावणे अशक्य असल्याचे जबाबदार पोलिस अधिकारीच सांगत असल्याने लूट झालेल्या व्यक्तीला निराशेपोटी घराची वाट धरावी लागत आहे. आता अशी फसवणूक झाली तर तक्रार दाखल करावी की नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत आहे. वांबोरी येथील ढवळे वस्ती येथील विजय भास्कर पठारे (49) हे नगर एमआयडीसीत काम करतात.

7 नोव्हेंबर रोजी पठारे यांनी पंजाब नॅशनल बँक, सावेडी शाखेचा टर्म लोनचा हप्ता फोन पे द्वारे भरला. 19 हजार 500 रूपये पैसे खात्यातून कमी होऊनही हप्ता भरला गेला नाही. त्यांनी फोन पे वर तक्रार केली. बँकेत विचारणा केली असता सर्व्हर समस्या असल्याने उशिरा पैसे जमा होतील असे सांगण्यात आले. 10 तारखेपर्यंत पैसे जमा न झाल्याने पठारे यांनी ऑनलाईन फोन पे ग्राहक सेवा केंद्र क्रमांकाचा शोध घेतला. तेथे त्यांना चुकीचा नंबर देण्यात आला. तेथे तक्रार दाखल झाल्यानंतर वेगळ्याच क्रमांकावरून त्यांच्याशी संपर्क साधला गेला. संबंधिताकडून हिंदी भाषेमध्ये तक्रारीचे निरसण करण्यासाठी मोबाईलमध्ये अव्वलडेस्क रिमोट डेस्कटॉप हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले.

विश्वासात घेऊन बँकेची माहिती घेण्यात आली. युपीआय आयडी देत त्यावर 62 हजार 998 रूपये पाठविण्यास सांगितले. त्यानुसार पठारे यांनी वेळोेवेळी 1 लाख 24 हजार 480 रूपये पाठविले. नंतर त्यांना फसवणूक झाल्याचे समजले. त्यांनी सायबर पोलिसांत धाव घेत त्या युपीआय नंबरविरोधात तक्रार दिली. गुन्हा दाखल करण्यात आला, मात्र नेहमीप्रमाणे तपास सुरू आहे. दरम्यान, राहुरी परिसरात सायबर लुटीचे अनेक प्रकार दिवसेंदिवस घडत आहे. पोलिस प्रशासनाकडे तक्रारी देण्यास गेल्यावर ते परराज्यातील तसेच सायबर हॅकर असल्याने छडा लागणे अशक्य असल्याचे सांगितले जाते.

केवळ गुन्हा दाखल करण्यावरच समाधानी ठेवले जात आहे. शिर्डी येथील सैन्य दलाच्या निवासामध्ये लाकूड पोहोच करा. तुम्हाला भाडे अदा करू, असे सांगत मालवाहतूकदाराला लिंक पाठविण्यात आली. ती लिंक ओपन करताच संबंधिताच्या बँक खात्यातून परस्पर 50 हजाराची रक्कम लंपास झाली. परंतु तक्रार दाखल होऊनही काही एक हाती आलेले नाही. तसेच काही दिवसांपूर्वी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून राहुरीतच तरूणाची लाखो रूपयांची फसवणूक झाली. त्याने तक्रार दिली, पण तपास शून्य. राहुरी तालुक्यामध्ये सायबर क्राईम लुटीचा नवा फंडा सर्वसामान्यांना गंडा घातला जात आहे. पोलिसांनी हे गांर्भीयाने घेवून तपास करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

सायबर क्राईमचा कारभार सांभाळलेले पोलिस निरीक्षक संजय सोनवणे यांच्याकडे राहुरीचा पद्भार आहे. त्यांचा सायबर क्राईम विभागातील कामाचा अनुभव पाहता राहुरी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांचा तपास होईल, अशी अपेक्षा तक्रारदारांना आहे. आता तपास होणार की पहिलासारखाच अनुभव येणार हे येणारा काळाच सांगेल.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news