रुंभोडी : पुढारी वृत्तसेवा : अकोले तालुक्याची 'भाग्य लक्ष्मी' अशी ओळख असणार्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा ऊस गळीत हंगाम सुरु झाला. गळीत हंगाम सुरू झाल्याने तालुक्यातील राजकीय केंद्रबिंदू ओळखल्या जाणार्या रुंभोडी परिसरातील इंदोरी, मेेहेंदूरी, म्हाळादेवी, निळवंडे, आंबड, उंचखडक खुर्द, उंचखडक बु., बहिरवाडी, इंदोरी फाटा, चितळवेढे गावाच्या कार्यक्षेत्रात उस तोडणी कामगारांचे अड्डे स्थिर होतआहेत. अनेक नवीन उस तोडणी कामगारांचे आमगन झाले. ऊस तोडणी कामगार मुकादम व टोळी मुकादमाच्या मार्गदर्शनाखाली अगस्ती कारखाना कार्यक्षेत्रात ऊस तोडणीस बिलगल्याचे चित्र दिसत आहे.
दिवाळी सणानंतर या भागात बरेच कामगार परंपरेनुसार दरवर्षीप्रमाणे कार्यरत असतात. ऊस तोडणीसह उसाच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये ऊस तोडणी काळात अकोलेची बाजारपेठ फुलून जाते. अकोलेच्या बाजारात भाजीपाल्याला चांगली मागणी वाढली. ऊस तोडणी कामगारांच्या अड्ड्यांजवळ किराणा दुकाने, पिठ गिरण्या, जनरल स्टोअर्स, मेडिकल यांच्याही धंद्यातही भर पडत आहे. अगस्तीच्या गळीत हंगामामुळे अनेकांना रोजीरोटीचे साधन उभे राहिले. यामुळे बाजारपेठेत बर्यापैकी उत्साहाचे वातावरण दिसत आहे.
'अगस्ती'कार्यक्षेत्रातील रस्त्यांची डागडुजी करणे महत्वाचे आहे.
यंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने रस्त्यांची पुर्णत: वाट लागली. मेहेंदूरी फाटा ते उंचखडक खुर्द पर्यंतचा रस्ता खड्डेमय झाला आहे. रुंभोडीचा महत्वपूर्ण पुलाची वाडी ते रुंभोडी हा शिवार रस्ता पुर्णतःउखडला आहे. माळीझाप मार्गे पान ओव्हेळातला पुलावर ऊस टायर उतरण्यासाठी उताराची तीव्रता मोठी असल्यामुळे येथे ऊस तोडणी कामगार अक्षरशः व्याकुळ होतात. उतार कमी करण्यासाठी भविष्यात पुलाची उंची वाढविण्याची गरज असल्याचे मत ग्राहक पंचायतीचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलीक यांनी व्यक्त केले.
मंडलीक म्हणाले, अगस्ती कारखाना ऊस क्षेत्राचा केंद्रबिंदू प्रवरा पट्टा आहे. इंदोरी, मेहेंदुरी, रुंभोडी यासर्व भागात ऊस तोडणी कामगार टायर गाडीतूनच कारखान्यापर्यंत पोहचतात, मात्र पानओव्हळातील पुलाची उंची कमी आहे. औरंगपूरच्या बाजूने उतार जास्त आहे.