नगर : बालकामगार ठेवणार्‍या हॉटेल चालकांवर गुन्हा

नगर : बालकामगार ठेवणार्‍या हॉटेल चालकांवर गुन्हा

नगर : पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलांना कामावर ठेवणार्‍या शहरातील पाच हॉटेल चालकांवर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत कामगार अधिकारी यासीन अब्दूलगनी शेख यांनी मंगळवारी (दि.22) दुपारी तोफखाना पोलिस ठाण्यात चार वेगवेगळ्या फिर्यादी दिल्या आहेत. डेक्कन चायनीज फास्ट फूडचा चालक रोशन लांबा (रा.कुष्ठधाम रोड, सोनानगर चौक, सावेडी), मनोज सुरेश बोज्जा, विशाल बहिरू धात्रक (रा.सोनानगरचौक, सावेडी), आदित्य डबेवालाचे चालक आदित्य कांतीलाल त्रिमुखे (रा.प्रोफेसर कॉलनी, सावेडी), भिस्तबाग चौकातील पार्वती कॉर्नरचे योगेश रमेश शेरकर (रा.भिस्तबाग चौक) असे गुन्हा दाखल झालेल्या हॉटेल चालकांची नावे आहेत.

सहायक कामगार आयुक्त कार्यालयाच्या पथकाने शहर परिसरात विविध ठिकाणी भेटी देत शोध मोहिम राबविली होती. यामध्ये चार ठिकाणी त्यांना बालकामगार ठेवल्याचे आढळून आले होते. त्यांची वैद्यकीय तपासणी जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्यात आली. त्याचा अहवाल सोमवारी (दि.21) सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाला प्राप्त झाला. अहवालात मुले अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर कामगार अधिकारी शेख यांनी मंगळवारी दुपारी पोलिस ठाण्यात चार वेगवेगळ्या फिर्यादी दिल्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news