

नगर, पुढारी वृत्तसेवा: काळाच्या ओघात आपण सहकार चळवळ बदलू शकलो नाही, त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. सहकारी चळवळ हा महाराष्ट्राचा आत्मा आहे. शिक्षक बँकेने मल्टीस्टेट बँक जर केली तर सभासदांचा अधिक फायदा होईल. या दृष्टीने संचालक मंडळाने लक्ष द्यावे. आज शिक्षक बँकेच्या प्रगतीमध्ये पायाचे दगड म्हणून काम केलेल्या व सिंहाचा वाटा असलेल्या माजी पदाधिकार्यांचा आगळावेगळा सत्कार ठेवल्याबद्दल शिक्षक बँकेला मनापासून धन्यवाद दिले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेतर्फे राहाता येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय सहकार परिषद व बँक शताब्दी महोत्सव कृतज्ञता सन्मान सोहळ्याप्रसंगी अध्यक्ष पदावरून ते बोलत होते. यावेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावर व्याख्याते प्रा.गणेश शिंदे, सातारा बँकेचे माजी अध्यक्ष सिद्धेश्वर पुस्तके, बळवंतराव पाटील, विनायकराव शिंदे, आप्पासाहेब कुल, गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकुंद सदाफळ,शिक्षक नेते संजय कळमकर, राजकुमार साळवे,दत्ता पाटील कुलट,विठ्ठल फुंदे, विद्युलता आढाव, अंजली मुळे, बाळासाहेब कदम,राजेंद्र ठोकळ, दिनेश खोसे, शरद वांढेकर, राजेंद्र निमसे, गोकुळ कळमकर, मनोजकुमार सोनवणे आदी उपस्थिती होती.
मंत्री विखे पाटील म्हणाले की, शिक्षक बँकेचे कार्यक्षेत्र वाढवण्याऐवजी ती मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह बँक करा. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा, नवीन नवीन सुविधा सभासदांना निर्माण करून द्याव्यात, अन्य मार्गाच्या व्यवसायातून बँकेचे उत्पन्न वाढवाव. केंद्रात भविष्यातही आपलेच सरकार राहणार आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला भक्कम साथ देऊ, अशीही ग्वाही दिली.
माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शिक्षक बँकेच्या कार्याचे कौतुक केले. शिक्षक नेते संजय कळमकर यांनी शिक्षक नेते बापूसाहेब तांबे व संचालक मंडळाचे अभिनंदन केले. शिक्षक संघाचे नेते बापूसाहेब तांबे यांनी राहाता शाखेसाठी आरबीआयच्या अडचणी दूर करण्यासाठी पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे, असे साकडे घातले. व्याख्याते गणेश शिंदे यांनी सहकार आणि शिक्षक यावर मार्गदर्शन केले. सत्काराला उत्तर देताना बँकेचे माजी अध्यक्ष सुभाष खोबरे यांनी आठवणींना उजाळा दिला. प्रस्ताविकात बँकेचे अध्यक्ष संदीप मोटे यांनी आढावा घेतला. याप्रसंगी बँकेचे माजी पदाधिकारी,संचालक तसेच माजी सर्व कर्मचारी यांचा मंत्री विखे पाटील व हर्षवर्धन पाटील तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र स्नेहवस्त्र, पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष कैलास सारोक्ते, साहेबराव अनाप, गोकुळ कळमकर, राजेंद्र पोटे, सलीमखान पठाण, शरद सुद्रिक, अर्जुन शिरसाट, किसन खेमनार, राजू राहणे,बाबा खरात, संतोष अकोलकर, राजेंद्र सदगीर, रमेश साबळे, अनिल भवार, गंगाराम गोडे आदी उपस्थित होते.