

नगर; पुढारी वृत्तसेवा : जनतेला सहाशे रुपये दरात वाळू उपलब्ध व्हावी, यासाठी नऊ वाळूगटांसाठी निविदा मागविल्या होत्या. परंतु फक्त नायगाव व मातुलठाण येथील पाच वाळूगटांना ठेकेदारांनी प्रतिसाद दिला. या पाच वाळूगटांचा ठेका देवा एन्टरप्रायजेसला मिळाला आहे. उर्वरित शेवगाव तालुक्यातील मुंगी व खरडगाव तसेच जामखेड तालुक्यातील चौंडी व पिंपरखेड या चार वाळूगटांना ठेकेदारांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पुन्हा निविदा मागविल्या आहेत.
शासनाच्या नवीन वाळूधोरणानुसार श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव, शेवगाव तालुक्यातील चापडगाव व जामखेड येथील चौंडी या तीन ठिकाणी वाळू डेपो निश्चित करण्यात आले. या डेपोवर विक्रीसाठी वाळू उपलब्ध व्हावी, यासाठी शेवगाव तालुक्यातील मुंगी क्रमांक 3 व खरडगाव, श्रीरामपूर तालुक्यात नायगावचे दोन व मातुलठाण येथे तीन तसेच जामखेड तालुक्यातील चौंडी 1 व पिंपरखेड येथे असे एकूण नऊ वाळूगट निश्चित केले. या वाळूगटांतून वाळूउपसा आणि वाहतुकीसाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या.
शुक्रवारी निविदा उघडल्या असता, फक्त श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव व मातुलठाण येथील पाच वाळूगटांसाठी निविदा दाखल झाल्या होत्या. यापैकी देवा एन्टरप्रायजेस या संस्थेला ठेका मिळाला आहे. या पाच वाळूगटांतून 67 हजार 549 ब्रास वाळूचे उत्खनन आणि वाहतूक होणार आहे.या ठेकेदाराच्या मार्फत नायगाव डेपोला विक्रीसाठी वाळू उपलब्ध होणार आहे.
नायगाव येथे सोमवारी दुपारी 12 वाजता राज्यातील पहिल्या शासकीय वाळूविक्री केंद्राचे उद्घाटन व वाळू विक्री ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील तसेच जिल्हाभरातील सर्व आमदार उपस्थित राहाणार असल्याचे जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ व अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी सांगितले.