खारघर प्रकरणी दोन दिवसांचे अधिवेशन बोलवावे: बाळासाहेब थोरात

खारघर प्रकरणी दोन दिवसांचे अधिवेशन बोलवावे: बाळासाहेब थोरात
Published on
Updated on

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या श्री सदस्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याच्या घटनेस खऱ्या अर्थाने राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार हे जबाबदार आहे. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. तसेच या घटनेवर चर्चा करण्यासाठी दोन दिवसाचे तात्काळ अधिवेशन बोलवावे, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे पत्रकारांशी बोलताना केली.

नवी मुंबईतील खारघरला आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी सुमारे 13 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. या पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी लाखोच्या संख्येने श्री सदस्य उपस्थित होते. मात्र, तापमान 45 डिग्रीपेक्षा जास्त आहे, हे राज्य सरकारला माहीत असतानासुद्धा श्री सदस्यांचे उन्हापासून संरक्षण होण्यासाठी कुठल्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे उपस्थित श्री सदस्य कडक उन्हात बसले होते. यामुळे काही श्री सदस्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. या मृत्यूस खऱ्या अर्थाने राज्यातील शिंदे- फडणवीस हे सरकारच जबाबदार आहे, असा गंभीर आरोप आमदार बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केला.

पुरस्कार वितरण कार्यक्रम सोहळ्यास उपस्थित राहणाऱ्या सर्व नेते मंडळींसाठी स्वतंत्र शामियाना उभारण्यात आला होता. मात्र, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो श्री सदस्यांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी कुठल्याही प्रकारची राज्य सरकारने व्यवस्था केली नव्हती. त्यामुळे राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार बारा ते तेरा श्री सदस्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. परंतु, मृत्यूचा आकडा जास्त असण्याची दाट शक्यता आहे, असे थोरात यांनी म्हटलं आहे आहे.

मंत्र्यांच्या घरावर लॉंग मार्च योग्य नाही

किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या घरावर लॉंग मार्च काढण्याचा इशारा दिला आहे. याबाबत विचारले असता आमदार थोरात म्हणाले की, नवले यांनी हा लॉंग मार्च जिल्हाधिकारी किंवा प्रांताधिकारी कार्यालयावर नेणे योग्य आहे. तो एखाद्या मंत्र्याच्या घरावरती नेणे योग्य नसल्याचे देखील थोरात यांनी यावेळी सांगितले

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news