

नगर; पुढारी वृत्तसेवा : दीडशे उच्चपदस्थ अधिकारी घडविणारे महापालिकेचे स्पर्धा परीक्षा केंद्र गेल्या काही वर्षांपासून बंद पडले आहे. केवळ निधी आणि नियोजनाअभावी केंद्र असून अडचण आणि नसून खोळंबा बनली. मात्र, त्या आयुक्त पंकज जावळे यांनी स्पर्धा परीक्षा केंद्राच्या प्रश्नामध्ये लक्ष घातले असून, लवकरच केंद्र सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजली.
अहमदनगर महापालिकेने गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम सुरू केला तो म्हणजे स्पर्धा परीक्षा केंद्र. महापालिकेने सावेडीच्या प्रोफेसर कॉलनी चौकाजवळ 25 एप्रिल 2007 रोजी हे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केले होते. त्यासाठी इमारतही बांधली. प्रा. एन. बी. मिसाळ यांनी या प्रकल्पाचे संचालक म्हणून 11 वर्षे काम पाहिले.
परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील कारभारात गैरव्यवहाराच्या आरोपांनंतर मिसाळ यांनी प्रभारी महापालिका आयुक्त तथा तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे राजीनामा दिला. त्यानंतर केंद्राला संचालकच मिळाला नाही. तेव्हापासून हे केंद्र बंदच आहे. महापालिकेनेही अर्थसंकल्पात केंद्रासाठी निधीची तरतूद केली नाही, हेही कारण केंद्र बंद पडण्यास कारणीभूत ठरले.
गेल्या 11 वर्षांत 660 विद्यार्थ्यांनी येथे शिक्षण घेतले. त्यांतील सुमारे दीडशे विद्यार्थी प्रशासकीय सेवेत आहेत. गेल्या दीड वर्षात 339 विद्यार्थ्यांनी या परीक्षा मार्गदर्शन केंद्रात प्रवेशासाठी चौकशी केली. खासगी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे वर्षाला सुमारे 25 ते 30 हजार रुपये आकारतात. शहरात खासगी सुमारे 25 केंद्रे आहेत. त्यांत सुमारे दीड हजार विद्यार्थी शिक्षण घेतात.
महापालिकेचे हे केंद्र गरीब विद्यार्थ्यांना वरदानच होते. महापालिकेत नूतन आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी समाजहिताच्या अनेक गोष्टींमध्ये लक्ष घातले. त्यातीलच स्पर्धा परीक्षा केंद्राचा समावेश आहे. स्पर्धा परीक्षा केंद्र निधीअभावी बंद असल्याचे समोर आले होते. आयुक्त यांनी त्यासाठी निधी उपलब्ध करून विद्यार्थ्यांना सर्व सुविधा मोफत उपलब्ध देण्याचा संकल्प केल्याचे समजते. संचालक नेमण्यापेक्षा केंद्र एखाद्या संस्थेला चालविण्यास देण्याचा विचार मनपा करीत आहेत. तशा काही संस्थानीही मनपाशी केंद्र चालविण्याची तयारी दर्शविली आहे. लवकरच त्यावर निर्णय होणार आहे.