

राहुरी; पुढारी वृत्तसेवा: वांबोरी पाणी योजनेसाठी कार्यारंभ आदेश देण्यात आल्याची माहिती आ. प्राजक्त तनपुरे यांनी दिली. राहुरी तालुक्यातील वांबोरी व वाड्या- वस्त्यांसाठी पिण्याच्या पाणी योजनेबाबत अधिक माहिती देताना आ. तनपुरे यांनी सांगितले की ,वांबोरी व वाड्या वस्त्यांकरीता नागरिकांना शुद्ध व मुबलक पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून जलजीवन मिशन योजनेंतर्गत या योजनेचा समावेश करण्यात आला होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्रालयात वेळोवेळी पाठपुरावा केला होता.
या योजनेसाठी (दि.11 एप्रिल 2022) रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व प्रादेशिक प्राधिकरण नाशिक यांच्या तांत्रिक समितीने मान्यता दिली होती. (दि.11 मे 2022) रोजी या योजनेला 40 कोटी 57 लाख रुपयांची महाराष्ट्र शासन पाणी पुरवठा विभागाची प्रशासकीय मान्यता मिळाली होती. या नवीन योजनेमुळे प्रति व्यक्ती 55 लिटर पाण्याची तरतुद करण्यात आली आहे.
वांबोरी व वाड्या वस्त्यावर पुर्ण दाबाने मुबलक शुध्द पाणी पुरवठा होण्यास मदत होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासुन प्रतिक्षेत असलेली ही योजना प्रत्यक्षात साकारणार असल्याने वांबोरी व परीसरातील नागरीकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. राहुरी, नगर व पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील विविध नवीन पाणी योजनांची कामे हाती घेण्यात आली आहेत. या संबंधीचे प्रस्ताव तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्रालयात दाखल करण्यात आले होते. काही योजनांचे कार्यारंभ आदेश होवुन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होवुन कामे प्रगतीपथावर असल्याचे आ. तनपुरे यांनी सांगितले.
या योजनेसाठी जलजीवन मिशन अंतर्गत स्थानिक तालुका ,जिल्हा व नाशिक विभाग तसेच मंत्रालय स्तरावर अधिकार्यांच्या विविध बैठका घेतल्या. त्रुटी दूर करीत प्रस्ताव दाखल केले. वेळोवेळी पाठपुरावा केल्याने प्रशासकीय मान्यता मिळविण्यात अडचणी आल्या नसून, कार्यारंभ आदेश निघाल्याचे ते म्हणाले.