राहुरी : पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनामध्ये आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राज्यातील महायुती शासनाच्या संथ कामकाजावर सडकून टीका साधत कोटीच्या बाता मारणार्या शासनाकडून केवळ घोषणांचा पाऊस होत आहे. निविदा होऊन 5 ते 6 महिने झाले तरी विकास कामे सुरू होण्यासाठी ठेकेदारांकडून टक्केवारी ठरविली जात नसल्यानेच कामे अडकून ठेवली जात असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला.
आ. तनपुरे यांनी अर्थसंकल्पिय अधिवेशनामध्ये सरकारला धारेवर धरले. हजारो कोटीच्या बाता मारणार्या शासनाचे सर्वसामान्यांच्या समस्याकडे दुर्लक्ष केले आहे. ग्रामिण भागात पाहणी केल्यास खरी परिस्थिती लक्षात येईल. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-2 साठी 7 हजार 600 कोटी रुपयांची घोषणा झाली. परंतु महाविकास आघाडी शासनाने टप्पा-2 ची योजना आणली. 2022-23 मध्ये मंजूर केलेल्या कामांचा प्रारंभ आता होऊ लागल्याने राज्यातील नावाने गतीमान परंतु कामाने गतीमंद शासनाचे कामकाज लक्षात येणार आहे. माझ्या मतदार संघामध्ये निविदा प्रसिद्ध होऊन वर्ष गेले तरी ठेकेदाराची नेमणूक होऊन काम सुरू झाले नाही.
दीड वर्षानंतरही काम सुरू न करणार्या संथगतीच्या शासनाच्या अवकृपेनेच कामाचा दर्जा घसरत असल्याची टीका आमदार तनपुरे यांनी केली. हर घर जलच्या नावाखाली राज्यातील जनतेची निव्वळ थट्टा सुरू असल्याचीही टीका केली. केवळ 25 टक्केच काम होऊन उर्वरीत कामासाठी वाढीव प्रस्ताव करावा लागत असल्यास सर्व्हे करणार्यावर जबाबदारी निश्चित करावी. एजन्सी व अधिकार्यांवर कठोर कारवाईची गरज आहे. हर घर जल हे वाक्य खोटे ठरत असल्याचाही आरोप त्यांनी केला. तसेच राहुरीच्या वकिल दाम्पत्य हत्येबाबतही त्यांनी आसूड उगारले.
तनपूरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महाविकास आघाडी शासनात सुरू केलेले प्रकल्प अजूनही सुरू झाले नसल्याचे सांगितले. आ. तनपुरे यांच्या टीकेबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी 'मला येऊन भेट' असे सांगताच एकच हशा पिकला. यावर आ. तनपुरे यांनी मी नेहमीच उपमुख्यमंत्री पवार यांना विकास कामांबाबत भेटत असल्याचे सांगत 'नक्की भेटतो' असे सांगितले.
हेही वाचा