सोयाबीन, कापसावर धोरणाची गरज : आ. काळे | पुढारी

सोयाबीन, कापसावर धोरणाची गरज : आ. काळे

कोळपेवाडी : पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे आ. आशुतोष काळे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात अभ्यासपूर्ण मांडणीतून सभागृहाचे लक्ष वेधले. सरकारच्या दृष्टीने शेतकरी व ग्राहक हे दोघे महत्त्वाचे आहेत. शेतकर्‍यांना पिकाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे. ग्राहकांनादेखील शेतमाल खरेदी करताना जास्त रक्कम मोजावी लागणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल, असे सांगत, दोघांचाही विचार करून शेतकरी व ग्राहक दोघेही खुश राहतील, यासाठी कांदा निर्यातीसह सोयाबीन, कापूस आदी पिकांसाठी धोरण आखणे गरज आहे, अशी आग्रही मागणी आ. काळे यांनी केली.

आ. काळे म्हणाले, राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेवून सरकारच्या माध्यमातून शेतकर्‍यांना आधार देण्याचा प्रयत्न होत आहे, मात्र सरकारकडून शेतकर्‍यांबाबत अजूनही काही प्रश्न शिल्लक राहिले आहेत, असे सांगत त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. मागील वर्षी अतिवृष्टी, सततचा पाऊस यामुळे नुकसान भरपाईपासून कोपरगाव मतदार संघातील काही शेतकरी वंचित राहिले. अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही. नुकसान भरपाई तातडीने मिळावी. एक रुपया पिक विमा योजनेनुसार सोयाबीनसह इतर पिकांचा शेतकर्‍यांनी पिक विमा काढला. 25 टक्के रक्कम शेतकर्‍यांना मिळाली, परंतु उर्वरित 75 टक्के रक्कम शेतकर्‍यांना मिळण्यासाठी पिक कापणी प्रयोग आकडेवारीनुसार व मागील उंबरठा उत्पन्न आदी गोष्टींचे निकष ठेवले आहे.

हे सर्व निकष पूर्ण करुन विमा कंपनीने शेतकर्‍यांना उर्वरितविम्याची रक्कम देणे क्रमप्राप्त आहे. पिक विमा कंपन्यांनी 75 टक्के पिक विम्याच्या रक्कमेबाबत केंद्र सरकारकडे अपील केले आहे. यावर तातडीने तोडगा काढून मध्यस्थी करून संबंधित रक्कम शेतकर्‍यांच्या पदरात लवकरात कशी पडेल, यासाठी सरकारने प्रयत्न करावा. अनेक शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला, परंतु निकषात बसत असतानादेखील 2 लाख कर्ज असलेल्या काही शेतकर्‍यांना लाभ न मिळाल्यामुळे कर्जमाफी मिळावी. नियमित कर्ज फेडणार्‍यांना शासनाने 50 हजार रुपये अनुदान काही शेतकर्‍यांना मिळाले नाही. ते लवकर मिळावे आदी प्रश्नांकडे आ. काळे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

हेही वाचा

Back to top button